नागपूर :– मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हे नागपूरमध्ये ओबीसींसाठी मोठा मेळावा घेऊन सरकारला थेट इशारा देणार आहेत. विशेष म्हणजे हा मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरात होत असल्याने या हालचालीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.
२ सप्टेंबर २०२५ रोजी राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ओबीसी संघटनांसह महात्मा फुले समता परिषद आणि बहुजन घटकांनी बेकायदेशीर व संविधानविरोधी असल्याचा आरोप करत तीव्र विरोध दर्शवला आहे. आरक्षणातील ही “घुसखोरी” ओबीसींच्या हक्कांवर अन्याय असल्याचे मत व्यक्त करत अनेक तरुण नैराश्यामुळे आत्महत्या करत आहेत, अशी गंभीर स्थिती संघटनांनी मांडली आहे.
या विरोधाला अधिक धार देण्यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी १० ऑक्टोबरला विदर्भात मोर्चा जाहीर केला आहे. त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता नागपूरच्या महात्मा फुले सभागृहात ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे. येथे ते मार्गदर्शन करणार असून, ओबीसी, विजेएनटी, एसबीसी समाजाचा आवाज बुलंद केला जाणार आहे.
राज्य सरकारचा निर्णय रद्द व्हावा, यासाठी आता दबाव वाढवण्याचा इशारा देण्यात येत आहे. भुजबळ हे स्वतः सरकारमधील मंत्री असूनही, थेट मुख्यमंत्र्यांच्या शहरातून सरकारलाच आव्हान देणार आहेत, यामुळे या मेळाव्याची राजकीय महत्त्वपूर्णता अधिकच वाढली आहे.




