पुणे :- ‘विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुण्याची ओळख गुन्हेगारी आणि दहशतीचे शहर अशी होत चालली आहे. शिवाजीनगर न्यायालयासमोर झालेला एकावर कोयत्याने वार करून गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेनंतर पुणेकरांच्या आणि एकंदरीत शहराच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे पुणे शहराला शोभणारे नाही. त्यामुळे पुण्याची जबाबदारी घ्यावी आणि पुण्याचे पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
गेल्या दोन वर्षात पुणे शहरात प्रचंड प्रमाणात गुुन्हेगारी वाढली आहे. पुणे शहर देशात ५ नंबर आणि महाराष्ट्रात १ नंबरला गुन्हेगारीमध्ये आहे. मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत. मला टीका करायची नाही. ‘न्यायालय हे सर्वसामान्यासाठी ‘न्यायदानाचे मंदिर’ असते. जिथे प्रत्येक नागरिक न्यायाच्या आणि संरक्षणाच्या अपेक्षेने येतो, त्याच पवित्र वास्तूच्या परिसरात जर भरदिवसा रक्ताचा सडा पडत असेल, तर सर्वसामान्य पुणेकरांनी कोणाकडे पाहायचे? न्यायालयाच्या परिसरात पोलिस चौकी आहे, सुरक्षा बंदोबस्त आहे आणि पोलिसांची सततची वर्दळ असते. भरदिवसा शस्त्रे घेऊन येण्याची आणि हल्ला करण्याची हल्लेखोरांची हिंमत होते कशी?, गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही, हेच यावरून स्पष्ट होते’, अशी टीका सुळे यांनी केली आहे. पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे का नाही, असा प्रश्न पुणेकरांच्या मनात आहे. न्यायालयाच्या परिसरात झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे सामान्य नागरिक दहशतीखाली आहेत. पुण्यातील पोलिस प्रशासन काय करत आहे? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला होता.
सुनेत्रा पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका
पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आहेत. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राजकारण सुरू असताना पुण्याचे पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या अप्रत्यक्षरित्या पालकमंत्री म्हणून अपयशी ठरल्या आहेत, अशी टीकाच सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.






