नागपूर :- जगातील पहिली दृष्टिहीन जलतरणपटू सतरा वर्षीय कुमारी ईश्वरी कमलेश पांडे हिने धोकादायक असलेल्या तलाईमन्नार (श्रीलंका) ते धनुष्कोडी (भारत) या ३८ सागरी कि.मी. अंतराची पाल्कची समुद्रधुनी अवघ्या ११ तास १५ मिनिटात यशस्विरीत्या पूर्ण करून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. ही ऐतिहासिक मोहीम फत्ते करणारी ईश्वरी ही पहिली दृष्टिहीन जलतरणपटू ठरली आहे. तिच्या या धाडसाचे तसेच विक्रमाचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
पाल्कच्या समुद्रधुनीसारखी अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक मोहीम यशस्वी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईश्वरीचे विशेष शुभेच्छा संदेशाद्वारे अभिनंदन केले आहे. तुझी ही विश्वविक्रमी मोहीम अनेकांसाठी प्रोत्साहन ठरणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
अथांग सागरातील महाकाय लाटा आणि आव्हानात्मक परिस्थितीवर मात करीत संपादन केलेले यश अभिमानास्पद आहे. तुझ्या अंगी असलेले हे धाडस आणि जिद्द आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. या यशासाठी पाठबळ देणाऱ्या कुटुंबीयांचे तसेच प्रशिक्षक, मार्गदर्शकांचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. तसेच पुढील सर्व मोहिमांसाठी आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
नागपूर येथील मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रसिद्धी समन्वयक अधिकारी अनिल गडेकर व अविनाश महालक्ष्मे यांनी नागपुरातील आशीर्वादनगर येथील कमलेश पांडे यांच्या निवासस्थानी जाऊन ईश्वरी पांडे यांना मुख्यमंत्र्यांतर्फे शुभेच्छा संदेश देऊन अभिनंदन केले.



