बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल : “आश्वासनं दिली, पण शेतकऱ्यांना विसरले”
भंडारा ५ – विदर्भ हा स्वतः मुख्यमंत्र्यांचा प्रदेश असूनही, याच भागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याची टीका माजी राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी केली आहे. “निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सातबारा कोरा’ करण्याचं आश्वासन दिले होते, मात्र आजतागायत ते पूर्ण झालेले नाही. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न अधिकच गंभीर झाले असून सरकारने आता शेतकऱ्यांना विसरल्यासारखं वागणं सुरू केलं आहे,” अशी टीका त्यांनी भंडाऱ्यातील पत्रकार परिषदेत गुरुवारी (४ सप्टेंबर) केली.
कडूंच्या म्हणण्यानुसार –
- भंडारा-गोंदिया जिल्ह्यापासून केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान केवळ १०० किमी अंतरावर असले, तरी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतेही विशेष धोरण नाही.
- सरकार धार्मिक आणि राजकीय प्रश्नांमध्ये जनतेला गुंतवून ठेवते, मात्र शेतकरी, मजूर, मच्छीमार, अपंग आणि प्रकल्पग्रस्त यांचे प्रश्न कायम दुर्लक्षित राहतात.
- सरकारकडे अदानी-अंबानी यांच्या १२ लाख कोटींची रक्कम माफ करण्याइतके पैसे आहेत, पण शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी निधी नाही.
- शेतकऱ्यांना सर्वसमावेशक कर्जमाफी द्यावी.
- उत्पादनाला हमीभाव मिळावा; धान उत्पादकांना प्रति क्विंटल किमान ₹५,००० हमीभाव मिळणे आवश्यक.
- शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनातून होणाऱ्या नफ्यात भागीदारी देण्यासाठी नवे धोरण आखावे.
कडू यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मागील सहा महिन्यांत विविध आंदोलने झाली आहेत. तरीही ठोस निर्णय न झाल्याने आता २८ ऑक्टोबर रोजी मोठं जनआंदोलन उभारण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेत प्रहारचे भंडारा-गोंदिया संपर्क प्रमुख संजय देशमुख, रमेश कारेमोरे आणि जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी उपस्थित होते.




