बालकलावंत सादर करणार ‘विठू माझा लेकुरवाळा’!

0
160

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५०) जयंती वर्षानिमित्त २१ ऑगस्टला विठ्ठल भक्तीचा जागर 

नागपूर  १९ – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे यंदा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५०) जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने सरगम संगीत अकादमी, जुना सुभेदार ले-आऊट यांच्यावतीने पंढरीचा पांडुरंग आणि संत मालिकेतील संताच्या जीवनकार्यावर आधारित ‘विठू माझा लेकुरवाळा’ हा दृकश्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, दि. २१ ऑगस्ट रोजी नागपुरातील बालकलावंत हा संगीतमय कार्यक्रम सादर करणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात नागपूरकर रसिकांना विठ्ठल भक्तीचा जागर अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमात विठ्ठलाची भक्तीगीते, अभंग भारुड, दिंडी तसेच महाराष्ट्रातील संतांचे जीवकार्य दृकश्राव्य रूपात सादर होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकलावंताना रंगमंच उपलब्ध करून देणे तसेच महाराष्ट्रातील संत परंपरेची गोडी नवीन पिढीमध्ये निर्माण करणे, हा मुख्य उद्देश असणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचनताई गडकरी यांचे हस्ते होणार आहे. यावेळी आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, भाजपा नागपूर महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, परशू ठाकूर, स्वप्नील मोंढे, नेहा लघाटे, साधना सय्याम, पियुष आंबुलकर आदी मान्यवर उपस्थित राहतील. सौ. कांचनताई गडकरी यांच्या हस्ते आध्यात्मिक क्षेत्रातील हभप अनिल महाराज अहिर आणि नाट्यक्षेत्रातील  देवेंद्र दोडके यांचा उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. श्रीरंग वराडपांडे यांची असून सरगम अकादमी चे संचालक भरत नरुले यांचे निर्मिती-दिग्दर्शन आहे. काव्य लेखन आणि संहिता – डॉ. राजेंद्रजी नाईकवाडे, कार्यक्रम संरक्षक – डॉ. संजय भक्ते, प्रणव हळदे यांचे आहे. तेजस्विनी कोमलकर, अंजली वानखेडे, बादल बोन्डे गाणी सादर करतील. तर नाट्यसंयोजन – अमृता बहातकर व अलका नरुले तर नृत्य दिग्दर्शन – श्रीकांत धबडगावकर, संगीत संयोजन – श्रीकांत पिसे याचे आहे. वादक कलावंतामध्ये ऑर्गन -सौरभ किल्लेदार, तबला –  प्रमोद बावणे,सुयोग देवलकर, बासरी – अरविंद उपाध्ये, मृदंग – आशिष गायधन/तेजस सांभरे, मायनर – विक्रम जोशी, टाळ – कुणाल फुलझेले, अभिषेक घुसे, साथसंगत करतील.

या कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून ओम सच्चीदानंद बिल्डर्स बेसा आणि सच्चिदानंद बिल्डर्स त्रिमूर्ती नगर, श्री संत गजानन महाराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह बैंक , रेशीमबाग, यांचे  सहकार्य लाभले असून कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरगम संगीत अकादमीचे पुष्पा मदनकर, माधवी जुननकर, मेघा घिमे, अपर्णा कल्ला वार, मेघा खोब्रागडे यांचे सहकार्य लाभले आहे.