spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सावंगा (बु) येथे बालविवाह रोखला

यवतमाळ :- दिग्रस तालुक्यातील सावंगा (बु), येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करत चाईल्ड हेल्प लाईन १०९८ आणि बाल संरक्षण विभागाने संयुक्त पथकाच्या मदतीने हा बालविवाह रोखला.

चाईल्ड हेल्प लाईनला या विवाहाबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. माहिती मिळाल्यानंतर सावंगा (बु) येथील अंगणवाडी सेविका यांच्याकडून बालिकेच्या वयाची नोंद तपासण्यात आली. नोंदीनुसार मुलीचे वय १७ वर्षे ६ महिने असल्याचे स्पष्ट झाले. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार मुलीचे विवाहाचे किमान वय १८ वर्षे, तर मुलाचे वय २१ वर्षे असणे आवश्यक आहे. त्यामुळे हा विवाह बेकायदेशीर ठरत होता.

यानंतर चाईल्ड हेल्प लाईनचे अधिकारी व जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे पथक संबंधित पत्त्यावर पोहोचले. बालिकेच्या पालकांना समुपदेशन करून अल्पवयात लग्न केल्यास होणारे कायदेशीर परिणाम व शिक्षा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. पालकांना सांगण्यात आले की, अल्पवयीनांचे लग्न लावणारे किंवा त्यास सहकार्य करणारे जसे की मंडप, डेकोरेशन, फोटोग्राफी, भोजन व्यवस्था इ. सेवा पुरवणारे यांच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा गुन्ह्यांसाठी दोन वर्षे कारावास व एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. पालकांना बालकल्याण समिती, यवतमाळ यांच्या समक्ष उपस्थित राहण्याचे सूचनापत्र देण्यात आले आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विशाल जाधव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, आणि चाईल्ड हेल्प लाईन समन्वयक फाल्गुन पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गणेश आत्राम, पूजा शेलारे, तसेच सावंगा गावातील व्ही. आर. मंगळे ग्रामसेवक रविकांत निकम सरपंच, महादेव सपरे तंटामुक्ती अध्यक्ष आणि दिग्रस पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र जगताप व पोलीस कॉन्स्टेबल यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

जिल्हा बाल संरक्षण कक्षाने गावात कुठेही बालविवाहाची माहिती मिळाल्यास ती त्वरित ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका किंवा थेट ‘चाईल्ड हेल्प लाईन १०९८ वर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन केले.

Popular Articles