नागपूर, ता ४ : नागपूर महानगरपालिकेद्वारा मोकाट कुत्र्यांची नसबंदी व रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत राबविण्यात आलेल्या ‘मिशन रेबीज’ या उपक्रमाला नागरिकाचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवसात ७० हून अधिक नागरिकांनी गुगल फोर्मद्वारे नोंदणी केली असून, दोन दिवसात ११८ भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यासाठीच्या ठिकाणाची माहिती देखील मनपाद्वारे गोळा केली जात आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी ‘मिशन रेबीज’ उपक्रम राबविण्यात येत आहे.. कुत्रे चावण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता महानगरपालिकेने ‘मिशन रेबीज’उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी बुधवारी(ता.३) इतवारी येथील नेहरु पुतळा येथे भेट देत मोहिमेची पाहणी केली. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
मागील १ सप्टेंबरपासून मोकाट कुत्र्यांची नसबंदी व रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण या मोहिमेची सुरुवात झाली आहे. 28 सप्टेंबरपर्यंत ही मोहिम चालणार असून, शहरातील २० हजार भटक्या कुत्र्यांना या मोहिमेत अँटी रेबीज लस दिली जाणार आहे. या मोहिमेकरिता वर्ल्ड वाईड व्हेटर्नरी सर्व्हिस (डब्ल्यू व्हीएस) तर्फे लसीसह डॉक्टर आणि सहायक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर महानगरपालिकेतर्फे वाहन आणि कुत्र्यांच्या लसीकरणासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे., पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात कुत्र्यांच्या व्हॅक्सिनेशनची मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
७० प्राणी प्रेमींनी लसीकरणासाठी केली नोंदणी
महानगरपालिकेतर्फे अँटी रेबीज लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्राणी प्रेमींना आवाहन केले आहे. प्राणीप्रेमींना त्यांची माहिती https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScCoeyLhuHmfrCIYA5cHQH9GmYK5lR7q5C6B1tgB0HVupEHZQ/viewform?pli=1. या गुगल फॉर्म भरून द्यावयाची आहे. त्यात आपले आपले नाव, पूर्ण पत्ता, झोनचे नाव, फोन नंबर, ईमेल आयडी, श्वानांना अन्न देण्याचे ठिकाण, त्या ठिकाणी असलेल्या श्वानांची संख्या, रेबीज लसीकरणाची स्थिती, आदी माहिती द्यावी भरावी लागणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी व स्वयंसेवी संस्थेचे डॉक्टर पोहचून कुत्र्याचे लसीकरण करणात आहेत. आतापर्यंत ७० इतक्या प्राणी प्रेमींनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.
मोकाट कुत्र्यांसाठी एबीसी (प्राणी जन्म नियंत्रण) कॅम्प’
शहरातील मोकाट प्राण्यांना हाताळणे व त्यांच्यावर नियंत्रणाच्या दृष्टीने नागपूर शहरामध्ये सध्या भांडेवाडी, गोरेवाडा आणि महाराज बाग येथे ‘एबीसी (प्राणी जन्म नियंत्रण) कॅम्प’ कार्यरत आहेत. शहरात कार्यरत तिनही एबीसी कॅम्प’मधील प्रगती आणि कामगिरीचे निरीक्षण करण्यासाठी एमएसयू चे पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे एबीसी कॅम्पचे मासिक रेकॉर्ड राखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ज्या व्यक्तींना कुत्र्याने चावा घेतला त्या रुग्णापर्यंत वैद्यकीय मदत व रेबीज लसीकरण झाल्याची खातरजमा करण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागा अंतर्गत आशा सेविकांकडे सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय मनपातर्फे रेबीज प्रतिबंधाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.




