spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महादेव घाट ते कन्हान नदी तीरापर्यंत स्वच्छतेचा जागर; छावनी परिषदेतर्फे व्यापक स्वच्छता अभियान

– ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२६’ अंतर्गत लोकसहभागातून श्रमदान; विधान परिषद सदस्य डॉ. राजीव पोददार यांच्या हस्ते वृक्षारोपण, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

कामठी :- सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, नदीकाठाचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी केवळ प्रशासनापुरती मर्यादित नसून ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश देत छावनी परिषद कामठीच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२६’ अंतर्गत महादेव घाट परिसर आणि कन्हान नदीच्या तीरावर व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य डॉ. राजीव पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमात प्रशासन, सैन्यदल, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या अभियानात छावनी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण सवंडकर, नामनिर्देशित सदस्य कमलकिशोर यादव, छावनी परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, सैन्यदलाचे अधिकारी, माजी सदस्य, छावनी परिषद शाळेतील विद्यार्थी, आशाराम कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी, एकलव्य फाउंडेशनचे स्वयं-सहायता गट, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. विविध घटकांच्या सहभागातून स्वच्छतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याचा प्रयत्न या वेळी करण्यात आला.

अभियानांतर्गत ‘एक पेड़ माँ के नाम’ उपक्रमाच्या माध्यमातून डॉ. राजीव पोतदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षसंवर्धन, हरित क्षेत्राचा विस्तार आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवडीसोबतच त्यांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे या उपक्रमातून विषद झाले.

शहर आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. स्वच्छतेच्या कामात प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, छावनी परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी पथनाट्यातून स्वच्छतेचे महत्त्व, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणातून स्वच्छतेची सवय लहान वयापासून रुजविण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. राजीव पोतदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी किरण सवंडकर यांनी स्वच्छतेचे महत्त्व विशद केले. नागरिकांनी दैनंदिन जीवनात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी आणि आपल्या परिसराचे सौंदर्य व स्वच्छता जपावी, असे आवाहन त्यांनी केले.

स्वच्छ भारताची निर्मिती केवळ प्रशासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांतून शक्य नसून त्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आणि सामूहिक जबाबदारी आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. नदीकाठ आणि सार्वजनिक स्थळांची स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी सातत्याने पुढाकार घेण्याची गरजही यावेळी स्पष्ट करण्यात आली.या अभियानात सहभागी झालेल्या सर्व घटकांनी प्रत्यक्ष श्रमदान करून स्वच्छतेप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. सार्वजनिक स्थळे आणि नदीचे तीर स्वच्छ ठेवणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि लोकसहभागातून स्वच्छतेची संस्कृती विकसित करणे, ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे होती.

छावनी परिषद कामठीने अभियानात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचे आभार मानले. स्वच्छतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह स्वच्छ आणि निरोगी छावनी निर्माण करण्याचा संकल्प या उपक्रमातून सादर करण्यात आला.

‘स्वच्छ छावनी, स्वस्थ छावनी — स्वच्छ भारत, सुंदर भारत!’ या संदेशातून स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.

Popular Articles