कळमेश्वर :- “वाहन खरेदीच्या वेळीच सरकार सर्व प्रकारचा रस्ते वाहतूक कर वसूल करत असतानाही टोल नाक्यांच्या नावाखाली जनतेची सर्रास लूट केली जात आहे. रस्ते वाहतूक विनामूल्य उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे,” अशी घणाघाती टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) राष्ट्रीय प्रवक्ते हर्षवर्धन ढोके यांनी केली आहे. सेलू-कळमेश्वर टोल नाक्यावरील नागरिकांची पिळवणूक त्वरित थांबवून हा टोल नाका कायमचा बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रशासनाला दिला आहे.
सध्या कळमेश्वर-सेलू टोल नाक्याने स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांच्या नाकात दम आणला आहे. येथील कर्मचाऱ्यांचे वर्तन अत्यंत उद्धट असून, ते पास देताना लोकांवर उपकार करत असल्याच्या भाषेत बोलतात. नियमानुसार किमान तीन महिन्यांचा पास देणे शक्य असताना, दर महिन्याला प्रवाशांना मुद्दाम रांगेत उभे केले जाते. आजच्या डिजिटल युगातही हा टोल नाका ऑनलाईन पास देण्यास सक्षम झालेला नाही. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, वैध पास असतानाही वाहनधारकांच्या ‘फास्टॅग’ (FASTag) मधून परस्पर पैसे कापले जात आहेत आणि पैसे भरूनही नागरिकांना पावती दिली जात नाही.
टोल नाक्याच्या नियमांची पायमल्ली करत अवघ्या १ किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांकडूनही येथे सक्तीने टोल वसूल केला जात आहे. चांगल्या रस्त्यांच्या नावाखाली सुरू असलेली ही लूटमार आता सहन केली जाणार नाही. परिसरातील नागरिक, शेतकरी आणि नोकरदारांचे हे अतोनात हाल पाहता, सेलू-कळमेश्वर टोल त्वरित बंद करण्यात यावा, अन्यथा आरपीआय जनतेच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल, असा इशारा हर्षवर्धन ढोके यांनी दिला आहे.




