– निवडणूक आयोगाच्या ‘मताधिकार’ मोबाईल ॲपचा असा करा वापर
नागपूर :- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता येत्या १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत मतदारांना आपले नाव शोधणे, मतदान केंद्र, बूथ क्रमांक जाणून घेणे आणि उमेदवारांची माहिती मिळवणे सोपे व्हावे, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. मनपा प्रशासनाकडून मतदारांना या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मताधिकार हे ॲप मतदाराना ‘गुगल प्ले स्टोअर’ वरून डाऊनलोड करता येऊ शकते.
ॲप कसे वापरावे ?
मताधिकार या ॲपद्वारे मतदाराचे नाव शोधण्यासाठी मतदाराला दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदाराचे ‘संपूर्ण नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल. त्यानंतर जिल्हा आणि महानगरपालिकेच्या नावाची निवड केल्यानंतर आपले नाव दिसेल.
याच मताधिकार ॲपच्या माध्यमातून मतदाराला पार्ट(भाग) क्रमांक, विधानसभा क्रमांक, मतदान केंद्राचे नाव आणि खोली क्रमांक सुद्धा माहिती कळू शकेल. याशिवाय मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून दिले आहे. त्यातील सर्च नेम इन व्होटर लिस्ट वर क्लिक करून ॲपप्रमाणे ‘नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल. अधिकाधिक मतदारांनी मताधिकार या ॲपचा वापर करून लाभ घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



