spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पावसाळ्यापूर्व नदी नाले सफाई अभियान लवकरात लवकर पूर्ण करा

– महापौर निता ठाकरे यांचे निर्देश

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील नागनदी, पिवळी नदी, पोहरा नदी या तीनही नद्यांची तसेच नाल्याची पावसाळ्यापूर्व सफाई अभियान ३० एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी गुरुवारी (ता १२) आयोजित बैठकीत दिले.

याप्रसंगी उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्ष नेता नरेंद्र बोरकर आणि मनपा आयुक्त डॉ विपीन, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, मुख्य अभियंता मनोज तालेवार, आरोग्य समिती सभापती मनीषा अतकरे, उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ गजेंद्र महल्ले उपस्थित होते.

मनपा तर्फे नदी आणि नाल्यांची सफाई १ मार्च पासून विविध टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदींचा एकूण लांबी ४९.१७ किलोमीटर एवढी आहे. महापौरांनी सर्व नगरसेवक यांच्या सहभागातून नदी आणि नाला सफाई करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, सफाई अभियानासाठी मोठ्या प्रमाणात मशिनरी लावा आणि ३० एप्रिल पर्यंत पूर्ण करा. तसेच सीवर चेंबर देखील साफ करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. त्यांनी सांगितले की, या पावसाळ्यात कोणाच्या घरी पावसाचा पाणी गेला नाही पाहिजे याची दक्षता मनपा प्रशासनाने घेणे गरजेचे असून, सफाई अभियानातून निघालेली गाळ टाकण्यासाठी जागा निश्चित करण्याचे तसेच सुरक्षा भिंत बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. नदी सफाईचे कार्य सुनियोजित पद्धतीने व्हावे, याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात यावे, स्वछता कार्य जलद गतीने व्हावे, यासाठी आवश्यकता भासल्यास आणखी मशीनरी लावण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

सत्ता पक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी सांगितले की, पुढच्या आठवड्यात महापौर तिन्ही नदीच्या आणि नाल्याचा सफाई अभियानाचा दौरा करून आढावा घेणार आहे. सहायक आयुक्तांनी आणि झोनच्या कार्यकारी अभियंता यांनी सफाई अभियानासाठी नगरसेवकांना विश्वासात घ्या. तसेच नागपूर शहराच्या बाहेर नाग नदी अरुंद झाली आहे, त्याचा खोलीकरण करणे आणि रुंदीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागपूर महानगर विकास प्राधिकरण सोबत चर्चा करून तोडगा काढण्याचेही त्यांनी यावेळी सुचविले.

स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी सुद्धा नदी सफाई अभियानाबद्दल आपले मत मांडले. अतकरे यांनी त्यांच्या प्रभागात होणाऱ्या समस्येबद्दल माहिती दिली. मनपा आयुक्त डॉ विपीन यांनी नदी आणि नाल्याची सुरक्षा भिंत बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, सफाई साठी अधिकची मशिनरी लावा आणि काम पूर्ण करा.

मुख्य अभियंता मनोज तालेवार यांनी माहिती दिली की, नागपूर महानगरपालिकाद्वारे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी आणि नाल्यांची सफाई करण्यात येते. नद्यांचे पात्र पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येतो. शहरातील नाग नदीची लांबी १६.५८ किमी, पिवळी नदीची लांबी १७.४२ किमी आणि पोहरा नदीची लांबी १५.१७ किमी आहे. सध्या नदी स्वच्छता अभियानात ६ पोकलेन लावण्यात आले आहे. नागपूर शहरातील सर्व झून मध्ये एकूण लहान मोठे २२७ नाले असून, त्यांची एकूण लांबी २४२.४५ किमी एवढी आहे. नालेसफाईचे काम सर्व झोनमध्ये सुरू आहे.येत्या एप्रिल अखेर पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना झोनला दिल्याची माहिती उपायुक्त राजेश भगत यांनी दिली.

अभियानांतर्गत नाग नदीच्या पात्राची सफाई केली जाणार आहे. त्यात अंबाझरी तलाव ते पंचशील चौक, पंचशील चौक ते अशोक चौकातून सेंट झेव्हिअर स्कूल ते संघर्षनगर आणि पाच टप्प्यांत सफाई करण्यात येणार आहे. तसेच पिवळी नदीच्या पात्राची गोरेवाडा तलाव ते नारा दहन घाट आणि नारा घाट ते एसटीपी वांजरा या दोन टप्प्यात सफाई केली जाईल. पोहरा नदीच्या पात्राची सहकार नगर घाट ते बेलतरोडी पूल आणि बेलतरोडी पूल ते हुडकेश्वर पिपळा फाटा पूल या दोन टप्प्यात सफाई करण्यात येणार आहे. याप्रसंगी सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता आणि झोनल स्वच्छता अधिकारी उपस्थित होते.

Popular Articles