– १३.५४ लाखांच्या थकबाकीपोटी मालमत्ता जप्त
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोन क्र. १ अंतर्गत मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू आहे. या अंतर्गत आय.टी. पार्क परिसरामधील मे. प्रिमीयर टेक्नॉलॉजी प्रा. लि. या कंपनीने सन २०२३ ते २०२५ या कालावधीतील मालमत्ता कराचा भरणा न केल्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सदर मलामत्ता धारकावर एकूण १३ लाख ५४ हजार ९६३ रुपये इतकी मालमत्ता कराची थकबाकी होती. या थकबाकीपोटी मनपाने वॉरंट जारी करून जंगम आणि स्थावर मालमत्तेची जप्ती व अटकावणी करण्याची कारवाई पार पाडली.
मे. प्रिमीयर टेक्नॉलॉजी प्रा. ली. च्या विविध मालमत्तावर थकबाकी होती यातील मालमत्ता घर क्र. १६४१/बी/२१ वर, रू ५,०२,४४६ रक्कम थकीत होती. तर १६४१/बी/२१/यु-१ वर रू. १,८५,२७४, रक्कम, १६४१/बी/२१/ यु-२ वर रू. ८४,६७६ रक्कम तर १६४१/बी/२१/यु.३ वर ५,८२,५६७ असे एकूण १३,५४,९६३ रक्कम थकीत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यात लक्ष्मीनगर झोनचे अधिकारी नरेश केळझरकर यांच्या नेतृत्वाखाली ही जप्तीची कारवाई करण्यात आली. यावेळी कर अधीक्षक, कर निरीक्षक गौतम मेश्राम, नरेंद्र जांभुळकर, पुरुषोत्तम भडंग आणि कर संग्राहक अमोल काटेकर, राहुल गेडाम आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई यशस्वी केली.
मालमत्ता धारकांनी जप्ती व अटकावणीच्या कारवाईची तातडीने दखल न घेतल्यास, मनपा अधिनियम ४५(१) अंतर्गत थकबाकीदारावर हुकूमनामा प्रसिद्ध करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मनपाने दिला आहे. सर्व थकबाकीदारांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी थकीत कर त्वरित भरावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.




