– आवडीनुसार आणि कल विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी
– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन
– बारावीच्या परीक्षेचा निकाल 89.79 टक्के
– मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 6.35 ने जास्त
मुंबई :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन करीत विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि कल विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी, या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे व यश संपादन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये आयोजित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल शनिवार दि. 2 मे 2026 रोजी मंडळाच्यावतीने जाहीर करण्यात आला.
याबाबत शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीला आज फळ मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांच्या पालकांचा त्याग आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे. या परीक्षेतील यशानंतर विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार विविध क्षेत्रांमध्ये वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. पुढील उच्च शिक्षणासाठी ज्या ज्या क्षेत्रात विद्यार्थी जातील त्या क्षेत्रात महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे. तुम्ही उद्याच्या भारताचे आधारस्तंभ आहात, तुमच्या कर्तृत्वातून एक समृद्ध समाज घडवण्याचे स्वप्न आपण सर्व मिळून पूर्ण करूया, अशा शब्दांत मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला आहे.
ही परीक्षा अंतिम ध्येय नसून, यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावे. हा निकाल विद्यार्थ्यांचे संपूर्ण भविष्य ठरवू शकत नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी जून- जुलै महिन्यात पुन्हा परीक्षा होतील. शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या विद्यार्थ्यांना दिलासाही दिला.
निकालाची वैशिष्ट्ये
या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी एकूण 14,44,713 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,33,058 विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी 12,86,843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची ही टक्केवारी 89.79 आहे. सर्व विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल 94.14 टक्के इतका सर्वाधिक आहे.
विभागीय मंडळ निहाय निकाल
कोकण विभागातील 94.14 टक्के, पुणे 91.25 टक्के, अमरावती 90.92 टक्के, नाशिक 90.72 टक्के, मुंबई 90.08 टक्के, कोल्हापूर 89.97 टक्के, छत्रपती संभाजीनगर 88.68 टक्के, नागपूर 88.67 टक्के आणि लातूर विभागातील 84.14 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मुलींची टक्केवारी अधिक
सर्व विभागीय मंडळांतून नियमित मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 86.80 टक्के असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 93.15 टक्के आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 6.35 टक्क्यांनी जास्त आहे.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 1,42,697 विद्यार्थी प्रावीण्यासह, 3,62,033 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 5,81,519 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 2,00,594 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
श्रेणीसुधार/ गुणसुधार योजना
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी / गुणसुधार योजनेअंतर्गत फक्त लगतच्या तीन परीक्षांमध्ये पुन:श्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या) जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 व जून-जुलै 2027 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस श्रेणीसुधार/ गुणसुधारसाठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत आहेत, असे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.