नागपूर २६ : नागपूर शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात काँग्रेसने सोमवारी मनपा मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस केतन विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहरातील प्रमुख आणि आंतरिक रस्त्यांवरील खड्ड्यांची छायाचित्रे मोठ्या फ्लेक्सवर प्रदर्शित करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रत्येक खड्ड्याचे जीपीएस लोकेशनसह पुरावे मनपा प्रशासनाला सादर करत तातडीने दुरुस्तीची मागणी केली.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “नागपूर तुला एनएमसीवर भरोसा नाय का?” अशा घोषणांनी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला. पोलिसांनी आंदोलकांना बॅरिकेटमागे रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्सवर चढून घोषणाबाजी सुरू ठेवत आक्रमक पवित्रा कायम ठेवला. यानंतर केतन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेत खड्ड्यांच्या जीपीएस लोकेशनसह संपूर्ण माहिती असलेले निवेदन सादर केले.
ठाकरे यांनी इशारा दिला की, आठ दिवसांच्या आत रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यांनी प्रशासनावर टीका करताना म्हटले की, “नागपूरमधील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळले जात आहे. मनपाने केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.” याशिवाय, खड्डे न बुजवल्यास मनपा अधिकाऱ्यांचे फोटो थेट खड्ड्यांमध्ये लावले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.



