कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कळमना–रनाळा मार्गावरील मरारटोळी परिसरात मोकळ्या जागेत सुरू असलेल्या सट्टापट्टीवर अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा, नागपूर शहराने गुरुवारी सायंकाळी धाड टाकली. या कारवाईत एका व्यक्तीस ताब्यात घेत त्याच्याकडून सट्टापट्टीचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या, रोकड व साहित्य असा २ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कळमना–रनाळा रस्त्यावरील ताज हॉटेललगतच्या मोकळ्या जागेत सायंकाळी ६.५५ ते ७.५५ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावेळी नदीम अख्तर सौकत अली अन्सारी (४६, रा. न्यू येरखेडा, कामठी) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांकडून पैसे स्वीकारून सट्टापट्टीचे आकडे घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान त्याच्याकडून २ हजार ३६० रुपयांची रोकड, सट्टापट्टीचे आकडे लिहिलेल्या कागदी चिठ्ठ्या आणि एक बॉलपेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात आरोपी नदीम अखतर सौकत अली अन्सारी विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





