– जमीन व महसूलविषयक प्रलंबित दावे तडजोडीने निकाली काढण्याचे प्रशासनाचे आवाहन
पांढरकवडा :- केळापूर तालुक्यात नागरिकांच्या महसूलविषयक प्रलंबित प्रकरणांचा परस्पर सामंजस्याने व तडजोडीने निपटारा करण्यासाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर विशेष लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
जमिनीशी संबंधित विविध महसुली दावे व अपीलांना परस्पर सामंजस्याने मार्गी लावण्याची संधी या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होणार आहे. प्रलंबित प्रकरणे विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोक अदालत पद्धतीने दोन्ही पक्षांच्या संमतीने व तडजोडीने निकाली काढून महसुली दावे कायमस्वरूपी संपुष्टात आणणे हा अभियानाचा उद्देश आहे.
१ ऑक्टोबरला मंडळस्तरीय लोक अदालत
दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी पांढरकवडा, केळापूर, चालबर्डी, करंजी, पहापळ, रूंझा व पाटणबोरी येथील मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये मंडळस्तरीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. तर ५ ऑक्टोबर २०२६ रोजी नायब तहसीलदार व तहसीलदार यांच्या स्तरावरील प्रकरणे तहसील कार्यालय, केळापूर येथे घेण्यात येणार आहेत. त्याच दिवशी उपविभागीय अधिकारी कार्यालय, केळापूर येथे उपविभागीय अधिकारी स्तरावरील प्रलंबित दावे व अपीलांवर लोक अदालत होणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी आपल्या प्रकरणांशी संबंधित आवश्यक कागदपत्रे व लेखी पुराव्यांसह सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी केले आहे. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत शेतीविषयक, रस्तेविषयक, संजय गांधी योजना, पुरवठा आदी विषयांशी संबंधित दावे योग्य दस्तऐवज व लेखी पुराव्यांसह दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या अभियानामुळे महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यास मदत होणार असून, नागरिकांना न्यायालयीन प्रक्रियेतील वेळ व खर्च टाळून आपले दावे मार्गी लावण्याची संधी मिळणार आहे. महसूल विभागाने तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.





