spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खरीप हंगाम २०२६ साठी पीक स्पर्धा जाहीर

· अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्याचा समावेश

· राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर मिळणार बक्षिसे

नागपूर :- पीक उत्पादकता वाढण्यासाठी शेतककऱयांना शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने खपीर हंगाम २०२६ साठी पीक स्पर्धा जाहीर केली असून, यात अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्यांचा समावेश आहे. या स्पर्धेत राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर बक्षिसे दिली जाणार आहेत.

पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग राबविले जातात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढविल्यास ते अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील व परिणामी उत्पादकतेत वाढ होईल. त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. या उद्देशाने ही पीक स्पर्धा घेण्यात येत आहे.

खरीप हंगाम २०२६ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भूईमूग व सूर्यफूल या ११ पिकांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे.

पीकस्पर्धेची वैशिष्ट्ये

या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै, तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भूईमूग, सूर्यफूल या पिकांससाठी ३१ ऑगस्ट अशी आहे. सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये, तर आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. एकावेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धकास स्वतःच्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (एक एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

ही स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून, सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील विजेत्यांची निवड करण्यात येईल.

अर्जांसोबतची कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र- अ), ठरवून दिलेले शुल्क भरल्याचे चलन, ७-१२ तसेच ८ अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७-१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक- पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

बक्षिसांचे स्वरूप

या स्पर्धेसाठी दिली जाणारी बक्षिसे पुढील प्रमाणे आहेत.

तालुका पातळी- प्रथम- ५००० रुपये, द्वितीय- ३००० रुपये, तृतीय- २००० रुपये.

जिल्हा पातळी- प्रथम- १०,००० रुपये, द्वितीय- ७,००० रुपये, तृतीय- ५००० रुपये.

राज्य पातळी- प्रथम- ५०,००० रुपये, द्वितीय- ४०,००० रुपये, तृतीय- ३०,००० रुपये.,

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले आहे. या योजनेबाबात अधिक माहिती www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मिळू शकेल.

Popular Articles