spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पीक विमा केवळ कागदावरच?; नरखेड तालुक्यातील ११,८५६ शेतकरी प्रतीक्षेत, भरपाई रखडल्याने आर्थिक संकट !

नरखेड :- नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना दिलासा देण्याऐवजी चिंतेचा विषय ठरत आहे. हेक्टरी १७ हजार रुपयांची मदत जाहीर होऊन तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला असला, तरी तालुक्यातील तब्बल ११,८५६ शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रुपयाही जमा झालेला नाही. कापणी प्रयोग पूर्ण झाले, नुकसानही निश्चित झाले, तरीही भरपाई रखडल्याने शेतकरी आर्थिक कात्रीत सापडले आहेत.

खरीप २०२५ हंगामात नरखेड तालुक्यात ११,८५६ शेतकऱ्यांनी ६६ लाखांहून अधिक रुपयांचा विमा हप्ता भरून ९,८७१.१५ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला. मात्र, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही विम्याचा लाभ मिळालेला नाही. ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान तालुक्यातील सातही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचा फटका बसला. ४९,५२२ हेक्टरपैकी २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. नैसर्गिक आपत्ती असूनही केवळ पीक कापणी प्रयोग हाच निकष ठेवल्याने अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत.

काढणीपूर्वी नुकसान झालेल्या पिकांचा यात समावेश होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यंदा एक रुपयातील पीक विमा योजना बंद करून पुन्हा हप्ता आकारण्यात आल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. ऑक्टोबरमधील अतिवृष्टीनंतर करण्यात आलेले पंचनामे नोव्हेंबरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर झाले तरी त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे ‘पीक विमा मिळणार तरी कधी?’ असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

Popular Articles