किशोर साहू, मौदा, ता. १८:- भगतसिंग चौक, व्यायाम शाळा परिसर, चाचेर येथे मकरसंक्रांतीच्या शुभ पर्वावर छत्रपती युवा प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने भव्य सांस्कृतिक मराठमोळ्या लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग न ठेवता, छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या युवकांनी स्वतः वर्गणी गोळा करून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
या कार्यक्रमात एक उल्लेखनीय व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी ग्रामपंचायत चाचेर येथील सफाई कर्मचारी उत्तम पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. गावाची स्वच्छता राखणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे समाजाचे अनेकदा दुर्लक्ष होते; मात्र राजकीय व्यक्तींचे सत्कार वारंवार होत असतात, ही भावना लक्षात घेऊन हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या निर्णयाचे चाचेर ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले.
या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक शिवशंकर वानखेडे, पुरुषोत्तम आंबीलढुके, धर्मराज आंबीलढुके, राजेश बावनकुळे, दिलीप वानखेडे, शंकर आंबीलढुके, दिलीप बावनकुळे, राजहंस कुल्लरकार, भाऊराव कुल्लरकार, प्रभाकर कुल्लरकार मोतीराम कुल्लरकार, कंटीराम आंबीलढुके, बाबुलाल साखरवडे, भोजराज मालेवार, भिमा पारधी तसेच इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाला छत्रपती युवा प्रतिष्ठान ग्रुपचे सर्व सदस्य व गावातील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक भान जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे कार्यक्रमास वेगळी ओळख प्राप्त झाली व संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला.




