– ‘मिशन सायबर फिट इंडिया’अंतर्गत सायबर हायजीन, सायबर एथिक्स आणि डिजिटल जबाबदारीवर जनजागृती
कामठी :- ‘मिशन सायबर फिट इंडिया’ उपक्रमांतर्गत एडुसन फाउंडेशनच्या वतीने व नागपूर पोलिस सायबर सेलच्या सहकार्याने एम.एम.रब्बानी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कामठी–नागपूर येथे सायबर हायजीन व सायबर एथिक्स या विषयावर सायबर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत इयत्ता ९वी ते १२वीतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी दोन सत्रांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन गेमिंग फ्रॉड, बनावट लोन ॲप्स, मालिशियस APK फाइल्स, सायबर बुलिंग, फसवे कॉल व संदेश, डिजिटल अरेस्ट व विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.नागपूर पोलिसांच्या सायबर सेलच्या रिसोर्स पर्सन आचल चितारे यांनी विद्यार्थ्यांना विविध सायबर धोक्यांची माहिती देत अनोळखी ॲप्लिकेशन डाउनलोड करू नये तसेच संशयास्पद लिंक, संदेश व ऑनलाइन ऑफर्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले.
एडुसन फाउंडेशनचे संचालक निलेश एच. काळे यांनी डिजिटल फुटप्रिंटचे महत्त्व स्पष्ट करताना सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट, माहिती किंवा प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करण्याचा सल्ला दिला. OTP, पासवर्ड, PIN, बँकिंग माहिती किंवा इतर गोपनीय माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीस देऊ नये तसेच संशयास्पद किंवा फसव्या कॉलला प्रतिसाद देऊ नये, असे त्यांनी सांगितले. मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे एकाग्रता, वाचनाची सवय, शैक्षणिक कामगिरी आणि करिअर विकासावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय, स्वतंत्र विचार आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच ChatGPT सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग अध्ययनासाठी सहाय्यक साधन म्हणून करावा; मात्र स्वतःची विचारशक्ती व शिकण्याची प्रक्रिया तंत्रज्ञानावर अवलंबून राहू नये, असा संदेश देण्यात आला. कार्यशाळेत झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यावहारिक मार्गदर्शनातून उत्तरे दिली.
कार्यक्रमाला एडुसन फाउंडेशनचे संचालक निलेश एच.काळे, नागपूर पोलिसांच्या सायबर सेलच्या रिसोर्स पर्सन अचल चितारे, प्राचार्य मसरूर अहमद, सहायक मुख्याध्यापक प्रा. सजिद अहमद खान आणि पर्यवेक्षक नसीम अहमद यांची उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी एडुसन फाउंडेशनने एम.एम.रब्बानी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य, सहायक मुख्याध्यापक, व्यवस्थापन व शिक्षकवृंद यांचे आभार मानले. तसेच रुबिना नेयाजी, एम. खलीक सानी आणि फुरकाना जाबीन यांच्या सहकार्याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले. ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली ही कार्यशाळा सायबर सुरक्षितता, डिजिटल जबाबदारी, सायबर एथिक्स आणि तंत्रज्ञानाच्या सुरक्षित वापराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण उपक्रम ठरली.




