नागपूर :- लकडगंज झोन अंतर्गत भारतवाडा रोडवरील गुलमोहर नगर परिसरात 500 मिमी व्यासाच्या वितरण जलवाहिनीला गळती लागली आहे. एअरटेलच्या केबल टाकण्याच्या कामासाठी सुरू असलेल्या एचडीडी (Horizontal Directional Drilling) कामादरम्यान संबंधित कंत्राटदाराकडून जलवाहिनीचे नुकसान झाल्यामुळे ही गळती निर्माण झाली.
शहरात विविध पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांअंतर्गत सुरू असलेल्या उत्खनन व केबल टाकण्याच्या कामांमुळे जलवाहिन्यांचे नुकसान होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा घटनांमुळे नागरिकांचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याबरोबरच जलवितरण यंत्रणेच्या संरचनात्मक सुरक्षिततेवरही परिणाम होतो आणि भविष्यात गळती व बिघाड होण्याचा धोका वाढतो.
उत्खननपूर्व समन्वय व पडताळणी यंत्रणेच्या अभावामुळे भूमिगत जलवाहिन्यांचे नुकसान होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. OCW-NMC ने वारंवार सर्व संबंधित यंत्रणांना उत्खनन सुरू करण्यापूर्वी जलपुरवठा विभागाशी समन्वय साधण्याचे आवाहन केले आहे.
संबंधित कंत्राटदार संस्थेने जलवाहिनीची तात्काळ दुरुस्ती करण्यास सहमती दर्शविली आहे. तथापि, दुरुस्तीस विलंब झाल्यास नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी OCW-NMC स्वतः दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारेल.
या दुरुस्तीच्या कामामुळे बुधवार, 10 जून रोजी सायंकाळचा (संध्याकाळी 5.00 ते 8.00) पाणीपुरवठा खालील भागांमध्ये प्रभावित होण्याची शक्यता आहे:
गुलमोहर नगर
हनुमान नगर
भगत नगर
नरसिंह सोसायटी
घासीदास नगर
भरतवाडा
NMC-OCW कडून सर्व उत्खनन, रस्ते बांधकाम, केबल टाकणे व इतर पायाभूत सुविधा प्रकल्प राबविणाऱ्या संस्थांना विद्यमान जलवाहिन्यांजवळ काम करताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
तृतीय पक्ष संस्थांकडून होणाऱ्या अशा अपघाती नुकसानीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन NMC-OCW तर्फे करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा, पाणीबिल किंवा इतर सेवांबाबत माहितीसाठी नागरिकांनी NMC–OCW हेल्पलाईन 1800 266 9899 वर संपर्क साधावा किंवा Nagpur Jal Grahak Sewa App चा वापर करावा.








