नागपूर, ता.११ : नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारताना शहरातील दहन घाटाची स्वच्छता देखील इतकीच महत्त्वाची आहे. याची जाणीव ठेवत नागपूर महानगरपालिका व नागपूर स्मार्ट सिटी द्वारा ‘स्वच्छता अपनाओ, बीमारी भगाओ’ अभियानांतर्गत शनिवार १२ जुलै रोजी सकाळी ६ ते ८ वाजता दरम्यान सखोल स्वच्छता केली जाणार आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. व अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वात घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे शहराला स्वच्छ, सुंदर, स्वस्थ आणि हरित स्वरूप देण्याच्या दिशेने पाऊल टाकत मनपाच्या दहाही झोन निहाय ‘सखोल स्वच्छता मोहिम’ राबविण्यात येणार आहे.
यात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या सहकार नगर दहन घाट, धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या अंबाझरी दहन घाट, हनुमाननगर झोन अंतर्गत येणाऱ्या मानेवाडा दहन घाट, धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या मोक्षधाम दहन घाट, नेहरुनगर झोन अंतर्गत येणाऱ्या दिघोरी दहन घाट आणि भांडेवाड़ी पशु निवारा केंद्र, गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या गंगाबाई दहन घाट, सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणाऱ्या शांती नगर दहन घाट लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या पारडी दहन घाट, आशीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या वैशाली नगर दहन घाट, मंगळवारी झोन अंतर्गत येणाऱ्या मानकापूर दहन घाट आणि महेश नगर येथे सखोल स्वच्छता केली जाणार आहे. यावेळी सर्व झोनचे सहायक आयुक्त व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित राहतील. जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. त्यानुसार नागरिकांनी यंदाच्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद द्यावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.
@filephoto




