गोंदिया ३ : गोंदिया शहराच्या मुख्य बाजारपेठेत नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर काही दुकानदारांनी स्वतःच्या मर्जीने दुकाने तोडून नव्या बांधकामाला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे परवानगीशिवाय सुरू असलेल्या कामांवर नगरपरिषदेची भूमिका काय, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषदेकडून काही वर्षांपूर्वी ही दुकाने बांधून भाड्याने देण्यात आली होती. मात्र, काही दुकाने लहान पडत असल्याने व्यापाऱ्यांनी स्वतःच ती तोडून नव्याने दुमजली बांधकाम सुरू केल्याचे सांगितले जाते. यापूर्वी पान लाईन भागातील एका दुकानालाही आग लागल्यानंतर असेच बांधकाम करण्यात आल्याचे समजते.
नगरपरिषदेने अशा कामांना थांबवण्यासाठी दुकानमालकांना नोटीस बजावल्याचे कळते, परंतु तरीही बांधकाम सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासन सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांबाबत भिन्न निकष लावत आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
या संदर्भात नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी यांनी, “घडलेल्या प्रकाराची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट केले आहे. तर, नगरपरिषदेचे C.O. संदीप बोरकर यांनी सांगितले की, “नगरपरिषदेच्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या मी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे, मात्र असे कोणी आढळल्यास नक्कीच कारवाई केली जाईल.”
आता खरेच नगरपरिषदेच्या हालचाली कितपत वेगाने होतात आणि हे बांधकाम थांबते का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


