किशोर साहू, मौदा :- एखाद्या रुग्णाच्या ताप औषधोपचार घेऊनही कमी होत नसल्यास, रक्त तपासणी केल्यानंतर अशा रुग्णाच्या आजाराच्या निदान डॉक्टर रक्त तपासणी अहवाल तपासल्यानंतर सामान्यपणे ‘डेंगू’हा आजार सांगतात. चाचेर-निमखेडा जिल्हा परिषद क्षेत्रातील गट ग्रामपंचायत गांगनेर ( हिवरा) येथील डेंगू या आजारावर प्रतिबंध लावण्यासाठी फवारणी करण्यासाठी वापरण्यात येणारी फॉगिंग मशीन मध्ये वारंवार बिघाड होत असून दुरुस्त केल्यानंतरही ती व्यवस्थित दुरुस्त होत नसल्याने, गट ग्रामपंचायत गांगनेर (हिवरा) येथील फागिंग मशीनलाच ‘डेंगू’ झाल्याची मिस्कील चर्चा गावात सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंधरा दिवसापूर्वी मौदा तालुक्यात दिवसभर पाऊस झाल्याने, सदर मौदा तालुक्यातील विविध गावातील विविध वृत्तपत्राचे एजंट व वार्ताहर यांनी सायंकाळ दरम्यान वृत्तपत्राचे वितरण केले. गट ग्रामपंचायत गांगनेर (हिवरा) अंतर्गत येणाऱ्या गांगनेर येथे सायंकाळ दरम्यान माजी सरपंच प्रदीप राऊत यांच्या दुकानात वृत्तपत्राचे वितरण करीत असताना तेथील काही नागरिकांनी, गावात खूप मच्छर झाले असून, जनावरांना व माणसांना खूप चावत आहे. त्यामुळे जनावर व माणसांच्या हातापायांना मच्छराच्या चावण्याच्या खूप त्रास होत आहे. त्यामुळे गावकरी मच्छरामुळे खूप त्रस्त आहे. अर्ध्या गावात फाॅगिंग मशीन ने फवारणी केली तर अर्धेगाव अजूनही फवारणी विना असल्याचे सांगत असताना, तेथे उपस्थित गट ग्रामपंचायत गांगनेर (हिवरा)चे सदस्य उमेश राऊत यांनी सांगितले की, अर्ध्या गावाची फवारणी झाल्यानंतर फॉगिंग मशीन बिघडली आहे. ती मशीन येथे दुरुस्त होत नसल्याने सध्या फॉगिंग बंद आहे. राऊत यांनी पुढे सांगितले की, फाॅगिंग मशीनने चावणारे मच्छर मरत नसून फक्त डेंगू या आजाराचा प्रसार करणारे मच्छरच मरतात.
याबाबत ग्रामपंचायतचे सचिव वरुडकर यांना ग्रामपंचायत कार्यालयात पाच दिवसांपूर्वी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, फॉगिंग मशीन कामठीवरून दुरुस्त करून आणली, दुरुस्तीच्या बिल दाखवत त्यांनी सांगितले की, जवळपास 5000 (अक्षरी पाच हजार) रुपये खर्च आला. दुरुस्त करून आणल्यानंतर गट ग्रामपंचायत गांगणेर (हिवरा) अंतर्गत येणाऱ्या हिवरा येथे ती मशीन पुन्हा फॉगींग साठी नेली असता पुन्हा बिघडली, ही मशीन वारंवार बिघडत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे ती ग्रामपंचायत मध्ये ठेवली आहे. त्यामुळे गट ग्रामपंचायत गांगनेर (हिवरा) येथील डेंगू वर प्रतिबंध लावण्यासाठी वापरण्यात येणारी फाॅगिंग मशीनलाच डेंगू झाल्याची मिस्कील चर्चा गावात सुरू आहे.
या फॉगिंग मशीनचा डेंगूच्या आजार दुरुस्त झाल्यानंतर, फवारणी करताना डेंगूच्या मच्छराबरोबर जनावर व माणसांना चावणारे मच्छर मरण्यासाठी त्या मशीनमध्ये माणसं व जनावरांना चावणारे मच्छरही मरावे अशी औषध टाकण्याची मागणी मच्छराच्या चावण्यामुळे त्रस्त नागरिकांनी केली आहे.




