Wednesday, February 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धामणगाव देव भक्तिमय ! “माऊलींच्या जयघोषात”श्री मुंगसाजी महाराजांना अभिवादन

– पालकमंत्री ना. संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती

यवतमाळ :- श्री मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी श्री मुंगसाजी महाराज संस्थान, धामणगाव देव या तीर्थक्षेत्रास भेट देऊन श्री मुंगसाजी माऊलींच्या स्मृतीस अभिवादन केले.

याप्रसंगी पालकमंत्र्यांनी भगवान श्री मुंगसाजी माऊली यांच्या समाधीचे दर्शन घेतले. मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात विधीवत आरती करून त्यांनी माऊलींचे आशीर्वाद घेतले. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती.

“माऊलींच्या विचारांत समाजाला एकत्र ठेवण्याची आणि संस्कार जपण्याची ताकद आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर आयोजित पालखी सोहळ्यातही ना. राठोड सहभागी झाले. पारंपरिक वेशात सजविण्यात आलेल्या पालखीचा मान स्वीकारत त्यांनी भक्तांसह काही अंतर पायी चालत सहभाग नोंदविला. ढोल-ताशांच्या गजरात आणि “माऊलींच्या जयघोषात”वातावरण भक्तिमय झाले होते.

कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्र्यांनी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबत सूचना जाणून घेतल्या व शासनस्तरावर आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

या दोन दिवसीय महोत्सवानिमित्त दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसर भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने भरून गेला होता. तसेच काल झालेल्या ‘महाराष्ट्र गौरव गाथा’ या सांस्कृतिक कार्यक्रमात पालकमंत्री देखील सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. विविध कलाकारांनी शिवसृष्टी, लोककला, भक्तिगीते आणि सांस्कृतिक नृत्याविष्कार सादर केले.

यावेळी पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी मुंगसाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या शिकवणी समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. “सर्व भक्तांच्या जीवनात सुख, समृद्धी व शांती नांदो,” अशी प्रार्थना त्यांनी मुंगसाजी महाराजांच्या चरणी केली. तसेच अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजात ऐक्य, श्रद्धा आणि संस्कारांची जपणूक होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी, तहसीलदार.गटविकास अधिकारी-बांधकाम विभाग व इतर सर्व विभागाचे अधिकारी, संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, मुख्य पुजारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि जीवन पाटील, यशवंत पवार, मनोज सिंघी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com