spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ईव्हीएमकडे बोट दाखवण्यापेक्षा ‘रडतराऊतांनी’ जनतेमध्ये जावे

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात  

मुंबई :- संजय राऊतांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा हवाला देत ईव्हीएमवर पुन्हा शंका घेत रान उठवायचा प्रयत्न केला आहे. लोकसभेमध्ये 48 पैकी 30 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या तेव्हा ईव्हीएम, निवडणूक आयोग, मतदारांचा कौल याबद्दल त्यांना शंका नव्हत्या. मात्र विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मतदारांनी भाजपा महायुतीला कौल देत मविआला घरी बसवल्यानंतर ईव्हीएम विरोधात विरोधकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी राऊतांची गत झाली असून रडतराऊतांनी रडत न बसता जनतेमध्ये जाऊन काम करावे आणि लढावे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईव्हीएमकडे बोट दाखवून राऊतांचा अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे. भाजपा महायुतीने मात्र याउलट लोकसभेचा निकाल स्विकारत जनतेमध्ये जाऊन कामे करत जनतेचा आशीर्वाद मिळवला, असेही ते म्हणाले.

संविधानाचा अवमान करणा-या राऊतांना जनता अद्दल घडवेल

राऊत सातत्याने घटनात्मक संस्थांचा अपमान करतात. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर प्रश्न उभे करून त्यांचा अवमान करतात. संविधानाचा अवमान करणा-या राऊतांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी प्रखर टीका बन यांनी केली.

काँग्रेस प्रवक्त्यांवरील हल्ल्याचा निषेध

पुण्यामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजपा निषेध करते. विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे. विचारांची लढाई मुद्द्यांऐवजी गुद्द्यांनी लढली गेली तर त्या लढाईचे समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही असे बन यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह खात्याने या संदर्भात कारवाईला सुरुवात केली असून काही लोकांना ताब्यात देखील घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली.

सोईस्कररित्या रोहित पवारांना राजधर्माची आठवण

रोहित पवारांना सोईस्करपणे राजधर्माची आठवण येते असे शरसंधान बन यांनी साधले. मविआ सरकारच्या कार्यकाळात भाजपा सोशल मीडियाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांची अटक, कोवीड काळात वास्तव समोर आणून मविआ सरकारवर कोरडे ओढणा-या पत्रकारांना गजाआड करणे, सरकार विरोधात एक कार्टून काढले म्हणून उबाठा गटाच्या लोकांनी नौदल अधिकाऱ्यांचा डोळा फोडणे, शरद पवारांविरोधात बोलली म्हणून अभिनेत्री केतकी चितळे वर शाई फेकणे, कंगना राणौतचे कार्यालय फोडणे अशा अनेक घटना घडल्या त्यावेळी रोहित पवार यांचा राजधर्म कुठे गेला होता असा सवाल त्यांनी केला.

जीवे मारण्याच्या धमक्या उद्धव ठाकरेंनी दिल्या

जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचा संस्कार भाजपाचा नाही. विचारांची लढाई भाजपा लढते. मात्र उद्धव ठाकरे यांनीच विधानसभा निवडणूक प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस यांना ‘एक तर तू राहशील किंवा मी राहीन’ असे म्हणत धमकावले होते, याचा सोईस्कर विसर उद्धव, राऊतांना पडला आहे असा टोला बन यांनी लगावला.

मुख्यमंत्रीपद सोडा साधे मंत्रिपद देण्याची दानतही उबाठांकडे नाही हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. याउलट एकनाथ शिंदे सारख्या निष्ठावंत शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी ही, जास्त संख्याबळ असताना देखील भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिली हे राऊतांनी जरा स्मरणश्कतीला ताण देत आठवावे असा टोमणा त्यांनी लगावला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.