– अध्यक्षा रूपाली चाकणकर गाऱ्हाणी ऐकून घेणार; पीडित महिलांना तक्रारी मांडण्याचे आवाहन
हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (राज्यमंत्री दर्जा) रूपाली चाकणकर या येत्या १७ फेब्रुवारी २०२६ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पीडित महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘जनसुनावणी’चे आयोजन करण्यात आले आहे. ही सुनावणी सकाळी ११:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडणार आहे.
जिल्ह्यातील अनेक महिला कौटुंबिक हिंसाचार, मालमत्ताविषयक वाद किंवा इतर छळाच्या प्रकरणांत न्यायाच्या प्रतीक्षेत असतात. अशा पीडित महिलांना आपले प्रश्न थेट आयोगासमोर मांडता यावेत, यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या सुनावणीचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना यासाठी कोणतीही पूर्वसूचना देण्याची आवश्यकता नाही. पीडित महिला प्रत्यक्ष सुनावणीला उपस्थित राहून आपल्या समस्या लेखी स्वरूपात आयोगापुढे सादर करू शकतील.
या जनसुनावणीत मालमत्ता हक्क, कौटुंबिक वाद आणि महिलांशी संबंधित इतर तक्रारींची दखल घेतली जाणार आहे. जास्तीत जास्त पीडित महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरुण बांदुरकर यांनी केले आहे.








