– मनपा सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मतदान प्रक्रियेला सुरुवात
नागपूर :- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाकरिता मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून, मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यांच्या आदेशाने दहाही झोन निहाय मनपाच्या ३ हजार ०४ मतदान केंद्राकरिता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे अर्थात ईव्हीएम चे वितरण करण्यात आले आहे. या मतदान केंद्रांवर एकूण ३ हजार पेक्षा जास्त कंट्रोल युनिट आणि जवळपास १० हजार बॅलेट युनिटचे वितरीत करण्यात आले आहे. या मशीन मध्ये प्रभागानुसार, बॅलेट पेपर लावण्यात येत असून, मेमरी चीप बॅटरी लावण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या तयारीच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी लकडगंज झोन येथील कामाचा आढावा घेतला. तसेच मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी अजनी येथील सामुदायिक भवनाला भेट देत पाहणी केली. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. आणि उपायुक्त मंगेश खवले यांच्या नेतृत्वात निवडणूक प्रक्रियेत कुठलीही तांत्रिक अडथळे येऊ नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १० टक्के राखीव यंत्रांची सोय आणि आवश्यक असल्यास अतिरिक्त अशी सोय करण्यात आली आहे. सध्या प्रत्येक प्रभागातील अ जागेसाठी पांढरा रंगाची मतपत्रिका, ब जागेसाठी फिका गुलाबी रंगाची मतपत्रिका, क जागेसाठी फिका पिवळा रंगाची मतपत्रिका, ड जागेसाठी फिका निळा रंगाची मतपत्रिका लावण्यात येत आहे.
हे सर्व मतदान यंत्रे सीताबर्डी येथील बचत भवनातून सुरक्षा कक्षातून वितरीत करण्यात आले आहे. याकरिता जीपीएस आणि पोलीस बंदोबस्तात वितरीत करण्यात आली आहे. वितरीत केलेली यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी ती मोहोरबंद करून सी.सी.टी.व्ही आणि पोलीस पहाऱ्यात संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे. यात मनपाच्या लक्ष्मीनगर झोन मधील ३२१ मतदान केंद्रांसाठी, धरमपेठ झोन मधील २८४ केंद्रांसाठी, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमान नगर झोन मधील ३२५ केंद्रांसाठी, धंतोली झोन मधील २५६ केंद्रांसाठी नेहरूनगर झोन मधील २८५ केंद्रांसाठी गांधी झोन महाल झोन मधील ३२७ केंद्रांसाठी सतरंजीपुरा झोन मधील २८२ केंद्रांसाठी लकडगंज झोन मधील २९६ केंद्रांसाठी आसीनगर झोन मधील ३१४ केंद्रांसाठी मंगळवारी झोन मधील ३१४ केंद्रांसाठी कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटचे वितरण करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करून या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. अशी माहिती नोडल अधिकारी यांनी दिली.








