spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून सामाजिक व्यासपीठ मिळते – सरोज वाघाये

– लाखनी येथे स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न; माजी आमदार सेवक वाघाये यांची उपस्थिती

हंसराज, प्रतिनिधी भंडारा लाखनी :- “वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे केवळ करमणूक नसून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवून त्यांना सामाजिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारे माध्यम आहे,” असे प्रतिपादन लक्ष्मी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सरोज सेवक वाघाये पाटील यांनी केले.

लाखनी येथील स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ९ व १० जानेवारी २०२६ रोजी आयोजित दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचा उद्घाटनीय सोहळा ९ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला, त्याप्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

या सोहळ्याचे उद्घाटन साकोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सेवक वाघाये पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून लाखनीच्या नगराध्यक्षा त्रिवेणी मनोज पोहरकर, पंचायत समितीचे बी.ई.ओ. सुभाष बावनकुळे, पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, प्राचार्य डॉ. गणेश कापसे, मनीषा सपाटे, महाविद्यालय प्रतिनिधी फाल्गुनी हजारे, भूमेश्वर गिरीपुंजे उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत स्वागतगीत व नृत्याने करण्यात आले.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांनी स्नेहसंमेलनाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, हा सोहळा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारा असतो. बी.ई.ओ. सुभाष बावनकुळे यांनी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यातील स्नेह वाढवण्याचा हा उत्सव असल्याचे सांगितले. तर पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी शालेय जीवनातील या आठवणी अविस्मरणीय असतात, असे मत व्यक्त केले. महाविद्यालय प्रतिनिधी फाल्गुनी हजारे हिने महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.

याप्रसंगी शैक्षणिक व इतर क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव सहकार्य करू,” असे आश्वासन यावेळी सेवकभाऊ वाघाये पाटील यांनी दिले.

उद्घाटनानंतर लगेचच विद्यार्थिनींच्या पुढाकाराने बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. यामध्ये समाजप्रबोधनपर नाटके, लावणी, गोंडी नृत्य, जोगवा आणि विविध रंगीबेरंगी नृत्यांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. स्मिता तितरमारे यांनी केले, तर आभार डॉ. अनुराधा खाडे यांनी मानले. या सोहळ्याला महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ने करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.