खापा २३ – महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व दूरदृष्टीचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नगर परिषद खापा यांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या अभ्यासिकेत मोफत पुस्तक वाटपाचा उपक्रम पार पडला. पियूष बुरडे यांनी पुढाकार घेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुस्तकांची मागणी यादी स्वरूपात घेतली आणि शक्य ती सर्व पुस्तके उपलब्ध करून दिली.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारी आवश्यक व दर्जेदार पुस्तके सहज उपलब्ध होणार असून, वाचन संस्कृतीला चालना देणारे हे कार्य उल्लेखनीय ठरत आहे. विशेष म्हणजे, पियूष बुरडे यांनी प्रत्येक नेत्यांच्या वाढदिवशी अशाच प्रकारे पुस्तके दान करण्याचे आव्हान उपस्थितांसमोर ठेवत एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल, त्यांना शैक्षणिक प्रवासात बळ मिळेल आणि समाजासाठी विधायक कार्य उभे राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात मुख्याधिकारी धनंजय सरनाईक, प्रशासकीय अधिकारी वैभव गोळे, नगर अभियंता अनिल कोंडे आणि अभियंता सोनवणे यांच्याकडे पुस्तके औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांमध्ये पियूष बुरडे, खेमराज बारापत्रे, अमोल भुते, पवन पैठणकर, सतीश लांजेवार, राहुल निर्मल, राजेशचंद्र बुरडे, सतीश बुरडे आणि मनोज बावणे यांचा समावेश होता.
वाचन प्रेरणा आणि समाज बांधणी यासाठी घेतलेला हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय ठरेल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.




