आष्टी व अहेरीतील रुग्णालयांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पाहणी

0
4

– औषधसाठा, रुग्णांचा आहार आणि आरोग्य सेवांच्या गुणवत्तेबाबत सूचना

गडचिरोली :- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि गावंडे यांनी २५ सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय, आष्टी; उपजिल्हा रुग्णालय, अहेरी आणि महिला व बाल रुग्णालय, अहेरी येथे भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. रुग्णांना वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा मिळावी, यासाठी त्यांनी औषधसाठा, आहार व्यवस्था, नोंदी आणि उपलब्ध साधनसामग्रीच्या वापराबाबत संबंधितांना सूचना दिल्या.

आष्टी ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग, प्रयोगशाळा, प्रसूती कक्ष आणि शस्त्रक्रिया कक्षाची डॉ. गावंडे यांनी पाहणी केली. गर्भवती महिलांच्या आवश्यक तपासण्या नियमितपणे कराव्यात, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकांनुसार आवश्यक बाबींची पूर्तता करावी आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार व लाभार्थ्यांच्या नोंदी व्यवस्थित ठेवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. वापरास अयोग्य ठरलेले साहित्य रुग्ण कक्षांतून सुरक्षित ठिकाणी हलवून त्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी केली.

अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात सेवा, सोनोग्राफी, लसीकरण, प्रयोगशाळा, औषध भांडार आणि आहार व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. औषधांची योग्य साठवणूक व वर्गीकरण करावे आणि मुदत संपण्याच्या जवळ असलेल्या औषधांची छाननी करून नियमानुसार कार्यवाही करावी, असे डॉ. गावंडे यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय व प्रशासकीय मनुष्यबळाच्या गरजेचाही त्यांनी आढावा घेतला.

सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कर्तव्य वेळापत्रक दर्शनी ठिकाणी लावावे आणि आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीतील माहितीची नोंद व नियमित पडताळणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले. पोषण पुनर्वसन केंद्रातील बालकांना व त्यांच्या मातांना नियमानुसार पौष्टिक आहार द्यावा. तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आहाराची दैनंदिन गुणवत्ता तपासून त्याची नोंद ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतही त्यांनी माहिती घेतली.

अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील नोंदणी विभाग, औषध भांडार, असंसर्गजन्य रोग विभाग, बाह्यरुग्ण विभाग आणि नेत्र विभागाची पाहणी करून डॉ. गावंडे यांनी दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. आवश्यक आरोग्य सेवा रुग्णांना वेळेत मिळतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ, औषधे आणि उपकरणांचा प्रभावी वापर करावा, असे त्यांनी सांगितले.