श्री गणेशा आरोग्याचा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
2

– १,२६९ आरोग्य शिबिरांतून ७०,९६४ नागरिकांची तपासणी; १,२३७ युनिट रक्तसंकलन

नागपूर :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानांतर्गत १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत मनपाच्या ५२ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व १०२ आरोग्य वर्धिनी केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. विशेष म्हणजे मनपाद्वारे ‘सेवा संकल्प अभियान’ देखील राबविण्यात येत आहे.

अभियानाच्या प्रगत अहवालानुसार एकूण १,२६९ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये एकूण ७०,९६४ नागरिकांची बाह्यरुग्ण तपासणी (OPD) करण्यात आली. यामध्ये २९,५७८ पुरुष, ३७,०८१ महिला आणि ४,३५४ बालकांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, हैदराबाद हाऊस, नागपूर यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात आला. अभियानांतर्गत आयोजित आरोग्य शिबिरांमध्ये नागरिकांची आवश्यकतेनुसार विविध वैद्यकीय तज्ज्ञांकडून आरोग्य तपासणी, निदान व उपचार करण्यात आले. तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा (Referral Services) उपलब्ध करून देण्यात आली.

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणीसोबतच विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून आतापर्यंत १,२३७ युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. या रक्तसंकलनामुळे गरजू रुग्णांसाठी रक्ताची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाला दिलेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे.

अभियानाच्या नियोजनाच्या अनुषंगाने मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. यावेळी सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरोग्य शिबिरे तसेच रक्तदान शिबिरांचे प्रभावी नियोजन, संबंधित रक्तपेढ्यांशी समन्वय आणि रक्तसंकलनाबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले होते.

या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणी, विविध आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपाय, आरोग्यविषयक जनजागृती तसेच उपलब्ध शासकीय आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात ‘उत्सव आरोग्याचा, संकल्प निरोगी समाजाचा’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आला.