– सिटी हॉस्पिटलमध्ये खंडणीची मागणी केल्याचा आरोप; नवीन कामठी पोलिसांत तरुणाविरुद्ध गुन्हा
कामठी :- सोशल मीडियावर बदनामीकारक व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरकडे तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केल्याने कामठीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी गुलाम नजर ऊर्फ शेख मोहम्मद (वय २७, रा. कादर झेंडा चौक, कामठी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिटी हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. तनजीम आजमी (वय ४६) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. २१ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.४८ वाजता डॉक्टरांचा कथित खोटा व अपमानास्पद व्हिडीओ ‘यश खोब्रागडे’ नावाच्या व्यक्तीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, २२ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २ वाजता आरोपी सिटी हॉस्पिटलमध्ये आला. त्याने डॉक्टरांकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास डॉक्टरांनी नकार दिल्यानंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तसेच हॉस्पिटलची बदनामी करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे हॉस्पिटल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियाचा गैरवापर करून दबाव निर्माण करत पैशांची मागणी केल्याच्या या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
डॉ. तनजीम आजमी यांच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(३)(४), ३५२ व ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नसून प्रकरणाचा पुढील तपास मपोउपनि सृष्टी कदम करीत आहेत.





