नागपूर :- नागपुरातील ज्येष्ठ संगीत साहित्यकार व मार्गदर्शक डॉ.अरुण बांगरे यांची कन्या व शिष्या डॉ. निरजा बांगरे वाघ यांना प्रतिष्ठित प्रथम स्वर योगिनी डॉ. प्रभा अत्रे “संगीत शोध पुरस्कार” त्यांनी केलेल्या “उत्तर हिंदुस्तानी संगीत में स्वरलिपी पद्धती की भूमिका एवं विकास” या शोध प्रबंधासाठी जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील विश्वव्याख्यात गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन तर्फे जाहीर झाला आहे .या पुरस्काराची घोषणा फाउंडेशन सचिव डॉ. भारती एम. डी. आणि ज्येष्ठ गायक आणि पुरस्कारासाठी परीक्षक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास कशाळकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.
हा पुरस्कार 6 सप्टेंबर रविवारी, प्रख्यात ध्रुपद गायक, संशोधक, शिक्षण तज्ञ, पद्मश्री व संगीत नाटक अकादमी पुरस्कारार्थी डॉ. ऋत्विक सान्याल यांच्या शुभहस्ते पुणे येथील गणेश सभागृह, टिळक रोड येथे भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येईल. या पुरस्कार प्राप्तीचे श्रेय डॉ. नीरजा बांगरे वाघ यांनी त्यांचे वडील व प्रथम गुरु डॉ. अरुण बांगरे व आई आसावरी बांगरे आणि त्यांच्या मार्गदर्शक डॉ. साधना शिलेदार – संगीत विभाग प्रमुख , वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था यांना दिले आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त करणाऱ्या डॉ. नीरजा बांगरे वाघ या विदर्भातील प्रथम शोधकर्त्या आहेत. या पुरस्कारामुळे संगीत साहित्याला व संशोधनाला अधिक चालना मिळेल.
डॉ. नीरजा बांगरे वाघ गेल्या १५ वर्षांपासून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायन व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत संगीत प्राध्यापक आहेत. तसेच भवन्स कला सृजन मध्ये संगीत शिक्षणाचे कार्य करीत आहेत.





