हंसराज, भंडारा :- सर्वसामान्यांची जीवनदायिनी लालपरी अर्थात सर्वांच्या लाडक्या एस.टी.च्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यभरातील विविध आगारांमध्ये सलग २५ वर्षे विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत रा.प. महामंडळाच्या भंडारा विभागातील दोन चालक – रमेश तुळशिराम पानतावणे (पवनी आगार) व मो. युसुफखान मो. युनसखान (भंडारा आगार, सध्या सेवानिवृत्त) यांची निवड करण्यात आली. त्यांचा सपत्नीक सत्कार विभागीय कार्यालय, भंडारा येथील प्रशिक्षण हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
प्रविण गोल्हर, विभागीय वाहतूक अधीक्षक (अतिरिक्त), रा.प. भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन शितल शिरसाट, विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून शैलजा वाघ दांदळे, जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा तसेच अॅड. प्रकाश निचकवडे, तालुका अधिवक्ता, रा.प. भंडारा विभाग उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी दोन्ही सत्कारमूर्ती चालकांचा सपत्नीक रोख रुपये २५ हजार, प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व साडी-खण देऊन गौरव करण्यात आला.
प्रमुख अतिथींनी आपल्या मार्गदर्शनात एस.टी.च्या ७८ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेत आजही जनतेचा एस.टी.वरील विश्वास कायम असल्याचे सांगितले. महामंडळाच्या विविध लोकाभिमुख उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही एस.टी.चा प्रवास यशस्वी राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच या सत्कारामुळे इतर चालकांनाही विना अपघात सेवा देण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत बक्षीसप्राप्त बसस्थानकांचेही अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती सांगोडे, वरिष्ठ लिपिक यांनी केले. प्रस्तावना चंद्रप्रकाश तरारे, स्वीय सहायक (विभाग नियंत्रक) यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद बारई, लेखाकार यांनी केले. कार्यक्रमास चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी, पर्यवेक्षक तसेच अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



