spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली

– दिलीप बनसोड यांचा महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल; प्रफुल अग्रवालही रिंगणात

हंसराज भंडारा :- भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महाविकास आघाडीकडून माजी आमदार दिलीप बनसोड यांनी अधिकृत उमेदवार म्हणून आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला. त्याचवेळी प्रफुल अग्रवाल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणुकीच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे झालेल्या नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान आमदार नाना पटोले, खासदार प्रशांत पडोळे, गोंदिया नगराध्यक्ष सचिन शेंडे, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, मोहन पंचभाई, राधेलाल पटले यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मोठ्या शक्तिप्रदर्शनासह दिलीप बनसोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात केली.

दुसरीकडे प्रफुल अग्रवाल यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीत रंगत आणली आहे. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत आमदार नाना पटोले, अशोक गप्पू गुप्ता तसेच काँग्रेसच्या महिला आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होत्या. प्रफुल अग्रवाल यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात विविध चर्चांना उधाण आले असून त्यांच्या उमेदवारीचा अंतिम निकालावर काय परिणाम होईल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी या निवडणुकीचे मतदार आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार या मतदारसंघात एकूण ४५७ मतदार असून महायुतीकडे महाविकास आघाडीच्या तुलनेत सुमारे १०० मतदारांचे संख्याबळ अधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संख्याबळाच्या दृष्टीने महायुतीचे पारडे जड मानले जात असले तरी प्रत्यक्ष मतदानावेळी होणारी क्रॉस व्होटिंग, नाराजी आणि स्थानिक राजकीय समीकरणे यामुळे निवडणुकीत अनपेक्षित घडामोडी घडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, १९९२ च्या विधान परिषद निवडणुकीप्रमाणे एखादा राजकीय उलटफेर घडण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. त्यामुळे संख्याबळात आघाडीवर असलेल्या महायुतीसमोर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे कडवे आव्हान उभे राहिले आहे. निवडणुकीच्या पुढील टप्प्यात पक्षीय रणनीती, मतदारांशी संपर्क आणि गुप्त राजकीय हालचाली यांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

आगामी काळात या मतदारसंघातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार असून भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक विदर्भातील सर्वाधिक चर्चेची निवडणूक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.