खापा, वार्ताहर :- खापा वनपरिक्षेत्रातील माताखेडी परिसरात अत्यंत दुर्मिळ असा निम्न विषारी फॉरेस्टर्न कॅट स्नेक (मांजर्या) आढळून आल्याची घटना समोर आली आहे. घराच्या दरवाजावर साप आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून सापाची सुरक्षित सुटका केली.
२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता माताखेडी येथील रेवतकर यांच्या घराबाहेर जाण्याच्या दरवाजावर साप आढळून आला. साप दिसताच नागरिकांनी गोलू लाड यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ माजी सर्पमित्र बब्लू निमजे यांच्याशी संपर्क साधला.
माहिती मिळताच सर्पमित्र विशाल शेंडे, प्रेम खडसे, सौरभ शेंडे तसेच सर्पमित्र सहाय्यक प्रतिक बिजेकर घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केल्यानंतर हा अत्यंत दुर्मिळ फॉरेस्टर्न कॅट स्नेक अर्थात मांजर्या असल्याचे निदर्शनास आले. सर्पमित्रांनी कौशल्याने व सुरक्षितपणे सापाचा रेस्क्यू केला.
यानंतर खापा वनपरिक्षेत्र अधिकारी विजय गंगावणे, क्षेत्रसहायक उमेश बावने व वनरक्षक अंकुश झोटिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या सापाला खुबाळा जंगल परिसरात सुरक्षितपणे निसर्गमुक्त करण्यात आले.
“पेंचच्या बफर क्षेत्रात आढळण्याच्या नोंदी”
सर्पअभ्यासक मयूर कनोजे (खापरखेडा) यांच्या माहितीनुसार, फॉरेस्टर्न कॅट स्नेकची पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात आढळण्याच्या नोंदी आहेत. हा साप निम्न विषारी, निशाचर आणि आर्बोरियल (Arboreal) प्रजातीतील असून झाडांवर राहणे त्याला पसंत असते.
खापा परिसरात या प्रजातीचा साप प्रथमच आढळून आल्याचे सर्पअभ्यासकांनी सांगितले. हा साप काळ्या व नारिंगी रंगछटांमध्ये आढळतो. जंगलातील सरडे, पक्षी तसेच पक्ष्यांची अंडी हे त्याचे प्रमुख खाद्य असून पर्यावरणीय समतोल राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. या प्रजातीचे साप साधारणपणे सहा फुटांपर्यंत वाढू शकतात.
दुर्मिळ साप आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तातडीने सर्पमित्र किंवा वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.








