spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“विकसित भारत रोजगार व आजीविका अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा”

◾ अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव

◾बेला येथे जिल्हास्तरीय शुभारंभ; मजुरांना आता १२५ दिवस रोजगार हमी

हंसराज,भंडारा :- “विकसित भारत रोजगार व आजीविका अभियान ज्या घटकांसाठी राबविण्यात येत आहे, त्या नागरिकांपर्यंत ही योजना अगदी सोप्या भाषेत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यातूनच योजनेची प्रभावी अंमलबजावणी होऊन गाव आणि जिल्ह्याचा विकास साधता येईल,” असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी केले. भंडारा पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत बेला येथे आज गुरुवारी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पार पडला, या प्रसंगी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ ग्रामपंचायत बेला येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी उपजिल्हाधिकारी जे. पी. लोंढे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे, जिल्हा उपसमन्वयक (वी बी जी राम जी) माणिक चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी सोनावणे, गटविकास अधिकारी प्रमोद हुमणे, माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य रत्नमाला चेटूले, सरपंच शारदा गायधने, सहाय्यक गटविकास अधिकारी वैद्य, ग्रामपंचायत अधिकारी विकास खोब्रागडे, उपसरपंच अर्चना कांबळे यांच्यासह ग्राम पंचायत पदाधिकारी, जिल्हा व पंचायत समिती स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

आपल्या मार्गदर्शनात अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले की, नव्या कायद्यातील बदल हे सर्वसामान्य नागरिक आणि मजुरांचे जीवनमान उंचावण्यासाठी करण्यात आले आहेत. या योजनेची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष सहभाग घेत जनजागृतीवर भर देणे आवश्यक आहे.

ते पुढे म्हणाले की, ३० जून २०२६ रोजी नरेगा योजना समाप्त झाली असून 1 जुलैपासून विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान लागू करण्यात आले आहे. या योजनेत सार्वजनिक व वैयक्तिक स्वरूपातील ३१८ कामांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मजुरांना पूर्वीच्या १०० दिवसांऐवजी १२५ दिवस रोजगाराची हमी देण्यात आल्याचे सांगून जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानाचे जिल्हा उपसमन्वयक माणिक चव्हाण यांनी सांगितले की, या अभियानाचा उद्देश केवळ रोजगार उपलब्ध करणे नसून शाश्वत सुविधा निर्माण करून नागरिकांच्या उत्पन्नात वाढ करणे आहे. जलसंधारण, तलाव निर्मिती, मत्स्यव्यवसाय आणि विविध विकासकामांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. याशिवाय पूर्वीच्या २६६ कामांच्या तुलनेत आता ३१८ कामांचा समावेश करण्यात आला असून मजुरी दरातही वाढ करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी वाढीव रोजगार दिवस व मजुरी वाढीमुळे ही योजना मजुरांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे सांगितले. सरपंच शारदा गायधनी यांनी ग्रामसभांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानाच्या आराखड्याला बळकटी द्यावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच शारदा गायधनी यांनी केले, तर आभार ग्रामपंचायत अधिकारी विकास खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद व ग्रामपंचायत बेला येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

बेला येथे वृक्षारोपणातून अभियानाची प्रत्यक्ष सुरुवात

विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पार पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, बेला येथे नव्या योजनेअंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, उपजिल्हा समन्वयक माणिक चव्हाण तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला बेला येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी पर्यावरण संवर्धनासह विकासकामांमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.