हंसराज,भंडारा हरदोली (सिहोरा) :- तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सुकळी नकुल येथील ग्रामपंचायत कर्मचारी गणेश शंकर आंबेडारे यांनी आपल्या थकीत हक्काच्या पैशांसाठी थेट कुटुंबासह आत्महत्येचा इशारा दिला आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साडेतीन लाखांची थकबाकी अडकली मिळालेल्या माहितीनुसार, गणेश आंबेडारे यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी (GPF) आणि राहणीमान भत्ता अशी एकूण ३ लाख ५२ हजार ६१८ रुपये रक्कम ग्रामपंचायतीकडे थकीत आहे. ही रक्कम मिळावी यासाठी त्यांनी ३० ऑक्टोबर २०२५ पासून वारंवार अर्ज केले. मात्र, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्राम अधिकारी आणि प्रशासक यांनी हेतुपुरस्सर ही थकबाकी देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आंबेडारे यांनी केला आहे.
नियमबाह्य बडतर्फीचा धक्का आंबेडारे यांनी पत्रात नमूद केले आहे की, १ एप्रिल २०२६ रोजी त्यांना कोणतीही ‘कारण दाखवा’ नोटीस न बजावता किंवा कोणताही सबळ पुरावा नसताना सेवेतून मुक्त करण्यात आले. नियमानुसार, कर्मचाऱ्याला सेवेतून मुक्त करताना त्याची संपूर्ण थकबाकी देणे बंधनकारक असते, मात्र येथे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले. केवळ राजकीय दबावापोटी आणि द्वेषभावनेतून ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रशासकीय अनास्थेचा कळस एकीकडे सरकार ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘ग्रामविकासा’च्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे जमिनीवर राबणाऱ्या कर्मचाऱ्याला आपल्या हक्काच्या पैशांसाठी आत्महत्येची भाषा करावी लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. “पगार आणि हक्काचे पैसे न मिळाल्यामुळे आज माझ्या कुटुंबावर उपासमारीची भीषण वेळ आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनच आम्हाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करत आहे,” असा संताप आंबेडारे यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव या संदर्भात आंबेडारे यांनी २९ जून रोजी प्रशासनाला लेखी इशारा दिला असून, याच्या प्रती भंडारा जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तुमसर गटविकास अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत. आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात वेळीच हस्तक्षेप करून एका कुटुंबाचा जीव वाचवतात की मोठ्या अनर्थाची वाट पाहतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




