देवस्थानही सुरक्षित नाही: सावनेरमध्ये हनुमान मंदिराची दानपेटी फोडून चोरी

0
68

सावनेर :- शहरातील गजबजलेल्या गोल बाजार परिसरात असलेल्या पुरातन हनुमान मंदिरात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार तोडून दानपेटी फोडली आणि सुमारे एक हजार रुपयांची रक्कम लंपास केली. ही घटना १७ एप्रिलच्या मध्यरात्री घडल्याचा अंदाज असून १८ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता मंदिर उघडताना पुजाऱ्यांच्या निदर्शनास आली.या प्रकरणी श्री हनुमान (मारोती) देवस्थान समितीचे अध्यक्ष गुलाब टेकाडे आणि सचिव विठ्ठल ठाणेकर यांनी सावनेर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

वाढत्या चोरीच्या घटना पोलिसांसमोर आव्हान शहरात विविध ठिकाणी २३ ठिकाणी एकूण ९१ सुरक्षा कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच स्थानिक पोलिसांकडून रात्री नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि गस्तही वाढविण्यात आली आहे. तरीही चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

चोरटे आता केवळ एकांतातील घरेच नव्हे, तर गर्दीच्या भागांनाही लक्ष्य करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे हे स्थानिक पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.