spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पाच दिवसांचा आठवडा, तरी कामठी तहसीलमधील लेटलतीफी कायम!

– सकाळी १०.३० वाजूनही अनेक अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित; नागरिकांची कार्यालयाच्या उंबरठ्यावर प्रतीक्षा

– महसूल मंत्र्यांच्या मतदारसंघातच प्रशासकीय शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर; वरिष्ठांच्या नियंत्रणाबाबत उपस्थित होतोय सवाल

– कार्यालयात कुणी नसतानाही पंखे लाईट सुरू ,विजेचा अपव्यवय

संदीप कांबळे,कामठी :- शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना वेळेत सेवा मिळावी, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करावे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे, यासाठी शासनाकडून विविध नियम व निर्देश जारी केले जातात. मात्र, कामठी तहसील कार्यालयातील आजचे चित्र पाहता या नियमांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत होत आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करून कार्यालयीन वेळ निश्चित केली असतानाही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कथित लेटलतीफीचे चित्र कायम असल्याचे दिसून आले.

कामठी तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना महसूल विभागाच्या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे असतात. अशा परिस्थितीत प्रशासनाने अधिक तत्परतेने कार्य करणे अपेक्षित असताना नागरिकांना कार्यालयाच्या उंबरठ्यावर बसून प्रतीक्षा करण्याची वेळ येणे ही प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब ठरत आहे.

आज मंगळवारी सकाळी १०.२५ वाजताच्या सुमारास तहसील कार्यालय परिसरात पाहणी केली असता मुख्य प्रवेशद्वार अर्धवट उघडे असल्याचे दिसून आले. कार्यालय पूर्णपणे सुरू झाले नसल्याचे समजून एक महिला कार्यालयाच्या उंबरठ्यावर बसून कार्यालय उघडण्याची प्रतीक्षा करीत होती. आवक-जावक विभागात कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले, तर तहसीलदारांच्या प्रस्तुतकार कार्यालयाला कुलूप असल्याचे आढळले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे, नायब तहसीलदार मोरे,नायब तहसिलदार अमर हांडा व एक महसूल सेवक तसेच बोटावर मोजणारे कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजना विभागात शिपाई मेश्राम उपस्थित होते; मात्र संबंधित नायब तहसीलदारांसह अन्य कर्मचारी हजर नसल्याचे दिसून आले. पुरवठा विभागातही कर्मचारी अनुपस्थित असल्याचे चित्र होते.

कृषी मंडळ अधिकारी कार्यालयातही कोणी उपस्थित दिसून आले नाही. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या तालुका कृषी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगवणे उपस्थित होते; मात्र अन्य कृषी अधिकारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली नाही. याबाबत एका कर्मचाऱ्याने काही कर्मचारी क्षेत्रीय कामावर तर काही रजेवर असल्याचे सांगितले.

भूमी अभिलेख कार्यालयातील कार्यालय प्रमुखांच्या कक्षाला कुलूप असल्याचे दिसून आले, तर भूप्रमाण केंद्रातही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळले. शेजारच्या खोलीत मात्र बोटावर मोजण्याइतके कर्मचारी बसलेले दिसून आले.

राज्याचे महसूल मंत्री, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील कामठी तहसील कार्यालयातच कार्यालयीन शिस्तीबाबत असे चित्र समोर येणे विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक विभागांमध्ये अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित असल्याचे चित्र दिसून येत असताना कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित होत आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी अर्थात मुख्यालयी राहण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले असतानाही कामठीतील विविध शासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयातील उपस्थितीबाबत उदासीनता दिसून येत आहेत. वरिष्ठ अधिकारी आणि विभागप्रमुखांकडून कार्यालयीन वेळेचे पालन सुनिश्चित केले जात आहे नसल्याचे सांगण्यात येते

पाच दिवसांचा आठवडा; कार्यालयीन वेळेचे बंधन मात्र कायम!

शासनाने फेब्रुवारी २०२० पासून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला. शनिवार व रविवार सुट्टी देण्यात आली असली तरी कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी निश्चित करण्यात आली आहे.

कार्यालयीन वेळेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपस्थिती प्रणालीवर बोटाचा ठसा उमटवून हजेरी नोंदविणे आवश्यक असून, तीन दिवस उशिरा उपस्थिती आढळल्यास एक दिवसाची किरकोळ रजा कमी करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

मात्र, कामठी तहसील कार्यालयातील आजच्या परिस्थितीवरून कार्यालयीन वेळेचे पालन आणि उपस्थिती नियंत्रण यंत्रणा कितपत प्रभावी आहे, हे दिसून येत आहे या प्रकाराला पाठराखन करणारे येथील विभाग प्रमुखच जवाबदार आहेत

नागरिकांना वेळेत सेवा मिळणार तरी कधी?

शासकीय कार्यालये ही नागरिकांच्या सेवेसाठी असतात. नागरिकांनी वेळेत कार्यालयात पोहोचूनही संबंधित अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित असल्यास त्यांच्या कामांचा खोळंबा होतो आणि प्रशासनाविषयी नाराजी वाढते. त्यामुळे कामठी तहसील कार्यालयातील आजच्या परिस्थितीची वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कार्यालयीन उपस्थिती, बायोमेट्रिक नोंदी आणि कार्यालयीन वेळेच्या पालनाची तपासणी करावी

कार्यालयीन शिस्त केवळ आदेशांपुरती मर्यादित राहणार की प्रत्यक्ष अंमलबजावणीतून नागरिकांना दिलासा मिळणार? हा प्रश्न आता कामठीच्या प्रशासकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे.

Popular Articles