– जुनी कामठी पोलिसांची दमदार कामगिरी; आरोपी अटकेत, न्यायालयात हजर
– दुकानातील ८ हजारांची रोकड चोरीप्रकरणी जलद तपास
कामठी :- कामठी शहरातील पिंगळे लिकर्स देशी दारू दुकानात झालेल्या चोरीच्या घटनेचा जुनी कामठी पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावून आरोपीला अटक केली. पोलिसांच्या तत्पर व प्रभावी तपासामुळे चोरीच्या प्रकरणाचा जलद उलगडा झाला असून, आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले आहे.आरोपीचे नाव सचिन उर्फ वांग्या कुंभरे असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी माणिक हिरालाल बावनकर (वय ५२ वर्षे, रा. गुजरजी बाजार, हिरा कॉम्प्लेक्स, कामठी) हे पिंगळे लिकर्स देशी दारू दुकानात व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते.
२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास दुकानात आल्यानंतर शटर अर्धवट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुकानातील लोखंडी दरवाजा उघड्या अवस्थेत आढळून आला. तपासणी केली असता कॅश ड्रॉवरमधील ८ हजार रुपये चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी जुनी कामठी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(अ) व ३३४(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत जुनी कामठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या २४ तासांच्या आत आरोपी सचिन उर्फ वांग्या राकेश कुंभारे (वय २८ वर्षे, रा. दुर्गा चौक, बेल बाजार, कामठी) याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले.
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीकांत भिष्णुरकर, पोलीस शिपाई शारीक खान व पोलीस शिपाई अमित ताजने यांनी केली.
जुनी कामठी पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत विश्वास व्यक्त केला जात आहे.








