spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर येथे कोजागिरी महोत्सव उत्साहात संपन्न; राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची विशेष उपस्थिती; ७० रक्तदात्यांचे रक्तदान, १२५ नागरिकांची नेत्रतपासणी; ‘संतान’ नाटक हाऊसफुल!

किशोर साहू, मौदा :- भगवान बाबा हनुमानजी यांच्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशानुसार, प.पू. परमात्मा एक सेवक मंडळ शाखा – चाचेर यांच्या वतीने आणि मार्गदर्शक धर्मराज बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कोजागिरी महोत्सव विविध धार्मिक, सामाजिक, आरोग्यविषयक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.

या महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार विभागाचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत व सहकार्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

रविवार( ता. १ नोव्हेंबर) ला सकाळी हवन कार्याने महोत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर भगवंत व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी आयोजित भगवत कार्याच्या चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून सेवकांना मानवधर्माच्या विचारांची व तत्त्वांची जाणीव करून दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मानव धर्म परिचय’ या पुस्तकाचे लेखक तथा ज्येष्ठ सेवक बाळूजी शेळके होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोजराज कुल्लरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन शुभम देशमुख व राहुल सोमनाथे यांनी केले. शुभम पोटभरे यांनी आभार प्रदर्शन केले.

रक्तदानातून ७० जणांचे योगदान; १२५ नागरिकांची नेत्रतपासणी

महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ७० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच मशीनद्वारे आयोजित मोफत नेत्रतपासणी शिबिराचा १२५ नागरिकांनी लाभ घेतला. धार्मिक कार्यासोबतच आरोग्य आणि सामाजिक सेवेचा संदेश देणारे हे उपक्रम महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.

‘संतान’ नाटकाला प्रचंड प्रतिसाद; प्रयोग हाऊसफुल!

महोत्सवातील सांस्कृतिक पर्वात युवा रंगमंच, वडसा प्रस्तुत युवराज प्रधान निर्मित तीन अंकी ‘संतान’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या नाट्यप्रयोगाला चाचेरसह परिसरातील नागरिक व रसिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे नाटकाचा प्रयोग हाऊसफुल झाला.

सेवक-सेविकांच्या परिश्रमातून महोत्सव यशस्वी

या संपूर्ण महोत्सवाच्या यशस्वितेसाठी चाचेर शाखेतील सेवक, सेविका आणि युवा सेवकांनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रचंड मेहनत घेतली. ग्रामस्वच्छता अभियानापासून ते धार्मिक विधी, चर्चासत्र, रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत प्रत्येक उपक्रमात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांच्या एकजुटीने, सहकार्याने आणि परिश्रमाने कोजागिरी महोत्सव यशस्वी ठरला.

धार्मिक विचारांची जोपासना, मानवसेवेचा संदेश, आरोग्यविषयक जनजागृती आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन अशा विविध उद्देशांची सांगड घालणारा हा कोजागिरी महोत्सव चाचेर परिसरासाठी संस्मरणीय ठरला.

Popular Articles