spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिद्दीला अनुभवांची जोड; भंडाऱ्यातील ३०८ जणांची आनंदवन आणि चंद्रपूरला शैक्षणिक भेट

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील २८० दिव्यांग विद्यार्थ्यांनी ८ आणि ९ जानेवारी रोजी शैक्षणिक क्षेत्रीय भेटीच्या माध्यमातून ज्ञानाची नवी क्षितिजे अनुभवली. वरोरा येथील ‘आनंदवन’ आणि चंद्रपूरचे ‘बॉटनिकल गार्डन’ येथे या विद्यार्थ्यांनी भेट देऊन विविध कौशल्यांची माहिती जाणून घेतली व मनोरंजनाचा आनंद लुटला.

या विशेष शैक्षणिक सहलीचा शुभारंभ ८ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद भंडारा येथून करण्यात आला. प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी बसेसला हिरवी झेंडी दाखवून सहल रवाना केली. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी मोहन उशिरे, राहुल बावा, जिल्हा समन्वयक विलास गोंदोळे, विशेष शिक्षक मुकेश बनसोड, जयश्री सावरकर, मनोज गावडे यांच्यासह विविध तालुक्यातील विशेष शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आनंदवनातील ‘श्रमशक्ती’ पाहून विद्यार्थी भारावले

वरोरा येथील आनंदवन भेटीत विद्यार्थ्यांनी बाबा आमटे यांच्या कार्याचा वारसा अनुभवला. येथील विविध कार्यशाळा, उद्योग केंद्र, अंध विद्यालय आणि मूकबधिर विद्यालयाला विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. दिव्यांग व्यक्ती स्वतः कष्ट करून, श्रम प्रतिष्ठा जपून नवनवीन वस्तू कशा तयार करतात, याचे प्रात्यक्षिक पाहून विद्यार्थी थक्क झाले. या भेटीदरम्यान दिव्यांग कलाकारांच्या सुप्रसिद्ध ‘स्वराली’ ऑर्केस्ट्राचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला.

सहलीच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी चंद्रपूर येथील बॉटनिकल गार्डनला भेट दिली. येथे निसर्गाच्या अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी ‘थ्री-डी ६०’ आणि ‘थ्री-डी ९०’ यांसारख्या आधुनिक खेळांचा व दृश्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विज्ञानाची ही प्रगत रूपे पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहत होता.

या शैक्षणिक सहलीसाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ७ एसटी बसेसची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. २८० विद्यार्थ्यांसोबत त्यांची काळजी घेण्यासाठी १४ मदतनीस आणि मार्गदर्शनासाठी १४ विशेष शिक्षक असे एकूण ३०८ जण या उपक्रमात सहभागी झाले होते. या भेटीमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली असून, त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत, असे मत शिक्षण विभागाने व्यक्त केले आहे.

Popular Articles