– घोरपडचे तरुण प्रगतिशील शेतकरी मंगेश लांजेवार आक्रमक
कामठी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘एनसीएमसी’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) योजनेच्या नोंदणीला शासनाने पुरेशी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कामठी तालुक्यातील घोरपड येथील तरुण प्रगतिशील शेतकरी मंगेश लांजेवार यांनी केली आहे.
एसटी महामंडळाच्या बसप्रवासात सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रणाली सुरू करण्यात आली ज्याची मुदत नुकतीच संपली मात्र, ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक व महिलांना शेतीकामामुळे अद्याप कार्ड काढता आलेले नाही. नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र लाभार्थी सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची परिस्थिती लक्षात घेता नोंदणीसाठी अतिरिक्त वेळ देणे गरजेचे आहे. अनेक प्रवाशांना कार्ड नोंदणीसाठी केंद्रावर वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून, काही ठिकाणी पुरेशा मार्गदर्शनाचा अभाव असल्याची बाबही लांजेवार यांनी निदर्शनास आणून दिली.
“शासनाच्या सवलतीचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे हा प्रशासनाचा उद्देश असला पाहिजे. मुदत संपल्यामुळे एकही ज्येष्ठ नागरिक किंवा महिला या सुविधेपासून वंचित राहू नये. त्यामुळे एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणीला मुदतवाढ देतानाच ग्रामीण भागात विशेष नोंदणी शिबिरे घ्यावीत,” अशी ठाम मागणी मंगेश लांजेवार यांनी केली आहे.





