spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तूर व हरभरा खरेदीला मुदतवाढ; राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा – मंत्री जयकुमार रावल

· हरभरा खरेदी उद्दिष्टातही 58632 मेट्रिक टनाची वाढ

मुंबई :- राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच हरभरा खरेदीत आणखी 58 हजार 632 मेट्रिक टन वाढ केली असून आता राज्यात 8 लाख 19 हजार 882 मेट्रिक टन हरभरा खरेदी करता येणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्य शासनाच्या मागणीनुसार तूर खरेदीची मुदत 31 मे 2026 पर्यंत तर हरभरा खरेदीची मुदत 29 मे 2026 पर्यंत वाढवून दिली आहे. तसेच हरभरा खरेदीत 58 हजार 632 मेट्रिक टन उद्दिष्ट वाढवून दिले, याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आभार मानले.

मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, सुरुवातीला केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत तूर खरेदीसाठी 90 दिवसांचा तर हरभरा खरेदीसाठी 60 दिवसांचा कालावधी मंजूर करण्यात आला होता. मात्र राज्यातील शेतकऱ्यांकडून मुदतवाढीची सातत्याने मागणी होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अतिरिक्त मुदतवाढ मिळवून दिली.

किमान हमीभाव योजनेअंतर्गत तूर खरेदीला 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात झाली असून, 1 मेपर्यंतचा कालावधी आता 31 मे 2026 पर्यंत वाढविण्यात आला आहे. खरीप हंगाम 2025-26 साठी राज्याला 3 लाख 37 हजार मेट्रिक टन तूर खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत 37 हजार 801 शेतकऱ्यांकडून 6 लाख 82 हजार 37 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.

हरभरा खरेदीला 1 मार्च 2026 पासून सुरुवात झाली होती. आधी 29 एप्रिलपर्यंत असलेली मुदत आता 29 मे 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. हरभरा खरेदीसाठी सुरुवातीला 7 लाख 61 हजार 250 मेट्रिक टन उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात आणखी 58 हजार 632 मेट्रिक टन वाढ करून एकूण उद्दिष्ट 8 लाख 19 हजार 882 मेट्रिक टन करण्यात आले आहे. आतापर्यंत 3 लाख 7 हजार 973 शेतकऱ्यांकडून 76 लाख 12 हजार 499 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे,अशी माहिती पणन मंत्री रावल यांनी दिली.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने तूर व हरभरा खरेदीसाठी नवीन तसेच एकदा वापरलेल्या लहान B-Twill ज्यूट पिशव्यांच्या वापरासही परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात खरेदी संस्थांच्या माध्यमातून तूर व हरभरा खरेदी पूर्ण पारदर्शकपणे सुरू असून शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी संबंधित यंत्रणेला वेळोवेळी सूचना देण्यात आल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.