spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गोंदियातील बिरसी विमानतळ झाले ‘शोपीस’; उडानचे स्वप्न हवेतच…

गोंदिया :- एकेकाळी उड्डाणांच्या गजराने गजबजणारा बिरसी विमानतळ सध्या ओस पडल्याचे चित्र आहे. सर्वसामान्यांना हवाई प्रवासाची संधी देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या विमानतळाची अवस्था आता ‘शोपीस’सारखी झाली असून, प्रवासीअभावी प्रमुख विमान कंपन्यांनी सेवा बंद केल्याने निराशा व्यक्त होत आहे.

इंडिगो आणि स्टार एअर या कंपन्यांनी गोंदियातील सेवा पूर्णतः स्थगित केली आहे. इंडिगोची गोंदिया–हैदराबाद–तिरुपती ही उड्डाण सेवा १ मे २०२६ पासून बंद करण्यात आली. अपेक्षित प्रवासी प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीने आपले संचालन गुजरातमधील जामनगर येथे हलवले. त्याचप्रमाणे, स्टार एअरने २६ एप्रिलपासून गोंदिया–इंदौर–मुंबई तसेच बेंगळुरू मार्गावरील उड्डाणे थांबवली. सुट्टीच्या काळात नफ्याच्या मार्गांना प्राधान्य दिल्याने लहान शहरांकडे दुर्लक्ष होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गोंदियातील हवाई सेवांचा इतिहासही चढ-उतारांनी भरलेला आहे. ‘उडान’ योजनेअंतर्गत फ्लाय बिगने १३ मार्च २०२२ रोजी सेवा सुरू केली होती; मात्र तांत्रिक अडचणी आणि नाईट लँडिंग सुविधेअभावी २१ ऑगस्ट २०२३ रोजी ती सेवा बंद करण्यात आली. सध्या विमानतळावर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असूनही प्रवासी संख्या केवळ ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली आहे. उड्डाण सेवा सुरू होताना श्रेय घेणारे राजकीय नेते आता मात्र गप्प असल्याचे दिसत आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या शहरांशी थेट हवाई संपर्काचे आश्वासन देण्यात आले होते; परंतु ते प्रत्यक्षात आलेले नाही.

सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

सध्या सामान्य प्रवाशांसाठी हवाई मार्ग बंद झाला असून, केवळ चार्टर्ड विमान किंवा हेलिकॉप्टर हाच पर्याय उरला आहे. मात्र त्याचा खर्च परवडणारा नसल्याने हा पर्याय सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

सेवा तात्पुरती स्थगित

“प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळाल्याने कंपन्यांना तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाचे प्रमुख प्रजापती यांनी दिली. बिरसी विमानतळाचे भवितव्य अद्याप अनिश्चितच आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.