– रस्ते आणि बांधकामाच्या धुळीने फुफ्फुसे धोक्यात
नागपूर :- नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत इमारती, रस्ते आदी बांधकामांची कामे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. परिणामी धूळ व वायूप्रदूषणात वाढ होऊन मागील तीन वर्षांत दम्याच्या रुग्णसंख्येत तब्बल १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अखत्यारितील फुफ्फुसरोग विभागाने हे निरीक्षण नोंदवले. ५ मे, जागतिक दमा दिनाच्या निमित्ताने हा आढावा सादर करण्यात आला. मेडिकलच्या फुफ्फुसरोग विभागाच्या अभ्यासानुसार, येथे दरमहा सुमारे १,२०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येतात. त्यापैकी सुमारे ४८० रुग्ण दम्याशी संबंधित आजारांचे असतात. या रुग्णांचा वैद्यकीय इतिहास पाहता त्यांच्या घराच्या किंवा कामाच्या परिसरात बांधकाम तसेच इतर प्रकारचे वायूप्रदूषण आढळते. यापूर्वी १,२०० रुग्णांपैकी सुमारे ३० टक्के (सुमारे ३५०) रुग्ण दम्याशी संबंधित असत. आता ही संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून येते. शहरातील सातत्याने सुरू असलेले बांधकाम, रस्ते खोदकाम, वाहतूक कोंडी आणि धुळीवरील अपुरे नियंत्रण ही दम्याची प्रमुख कारणे ठरत आहेत. बांधकामातून निर्माण होणारी धूळ (पीएम १०, पीएम २.५, सिलिका, सिमेंट कण, डिझेल धूर) श्वसनमार्गात जाऊन दाह वाढवते, श्वासनलिका अधिक संवेदनशील करते आणि दम्याचे झटके तीव्र करते. मुलांमध्ये फुफ्फुसांची वाढ खुंटणे, वारंवार घरघर आणि लवकर वयात दम्याचा धोका वाढतो; तर प्रौढांमध्ये खोकला, छातीत जडपणा, फुफ्फुसांची कार्यक्षमता घटणे आणि औषधांवरील अवलंबित्व वाढते, असेही अभ्यासात नमूद आहे.
निरीक्षणात काय?
नागपुरात मुलांमध्ये दीर्घकाळ खोकला, खेळताना दम लागणे आणि रात्री लक्षणे वाढणे आढळते; तर प्रौढांमध्ये सतत खोकला, ‘ब्रॉन्कायटिस’ची पुनरावृत्ती आणि इनहेलरचा वाढलेला वापर दिसतो. मात्र, उपचार करताना पर्यावरणीय कारणांकडे दुर्लक्ष होते, ही गंभीर बाब आहे. धुळीसोबतच वाहनांचा धूर, बायोमास इंधन, परोक्ष धूम्रपान, उदबत्ती व डास अगरबत्ती, औद्योगिक प्रदूषण, कचरा जाळणे, ओलसर घरे आणि ॲलर्जन्स हे घटकही दम्याचा धोका वाढवतात. त्यामुळे दमा हा एका कारणाचा नव्हे, तर अनेक सूक्ष्म श्वसन-इजांचा एकत्रित परिणाम असल्याचे स्पष्ट होते.
प्रतिबंधावर भर आवश्यक
बांधकामस्थळी धूळ नियंत्रणासाठी बॅरिकेडिंग, पाण्याची फवारणी, मलबा झाकणे आणि वाहतूक वाहनांना कव्हर अनिवार्य करणे गरजेचे आहे. हरित पट्टे निर्माण करणे, प्रदूषणाच्या काळात मुलांचे बाहेरील खेळ टाळणे, योग्य वायुविजन राखणे, स्वच्छ इंधनाचा वापर, धूम्रपानबंदी, उदबत्ती/अगरबत्तीचा मर्यादित वापर, तसेच घरातील ओलसरपणा व बुरशी नियंत्रण आवश्यक आहे. मुलांमध्ये वारंवार खोकला किंवा घरघर, तसेच प्रौढांमध्ये सतत खोकला असल्यास स्पायरोमेट्री तपासणी करावी. केवळ रिलीव्हर औषधांवर अवलंबून न राहता इनहेल्ड कॉर्टिकोस्टिरॉइड्सचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. नागपूरसह देशभरात दम्यावरील नियंत्रण सुधारण्यासाठी केवळ औषधोपचार पुरेसे नसून स्वच्छ हवा, सुरक्षित बांधकाम, जनजागृती आणि लवकर निदान यांवर भर देणे आवश्यक आहे. सामूहिक प्रयत्नातून प्रदूषण कमी करून स्वच्छ हवा निर्माण करणे हेच दम्यावरील प्रभावी उपाय आहे, अशी माहिती फुफ्फुसरोग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.