spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आता व्हॉट्सॲपवरच मिळणार वीजबिल!

– महावितरणची नवीन सेवा सुरू

नागपूर :- मुंबईचा काही भाग वगळता राज्यभर वीज वितरण करणाऱ्या महावितरणने डिजिटल युगात एक महत्त्वाचे पाऊल टाकत वीज ग्राहकांसाठी ‘व्हॉट्सॲप सेवा’ सुरू केली आहे. या माध्यमातून वीजबिल पाहणे, भरणे, तक्रार नोंदवणे तसेच नवीन जोडणीच्या अर्जाचा मागोवा घेणे, या सर्व सुविधा आता ग्राहकांना घरबसल्या भ्रमणध्वनीवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कार्यालयांच्या खेटा घालण्यापासून ग्राहकांची सुटका होणार आहे. ही सेवा सुरू झाली असली तरी, उद्घाटनाच्या तारखेसाठी कंपनीकडून चाचपणी सुरू आहे. राज्यातील सुमारे ३ कोटी १२ लाख, तर नागपूर परिमंडळातील जवळपास १९ लाख ग्राहकांसाठी व्हाॅट्सॲप सेवा सुरू करण्यात आली आहे. व्हॉट्सॲपच्या वाढत्या वापराचा विचार करून विकसित करण्यात आलेली ही प्रणाली ग्राहकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचवणारी ठरणार आहे. या सेवेअंतर्गत ग्राहकांना चालू महिन्याचे वीजबिल पाहता येणार असून, डेबिट कार्ड किंवा यूपीआयद्वारे तत्काळ भरणाही करता येणार आहे. देयक भरल्यानंतर पावतीही तत्काळ उपलब्ध होणार आहे. ‘गो-ग्रीन’ उपक्रमाला चालना देत डिजिटल ई-बिल डाऊनलोड करण्याची सुविधाही या सेवेद्वारे देण्यात आली आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होणे किंवा बिलासंबंधी अडचणी असल्यास तक्रार नोंदवता येणार असून, त्या तक्रारीची स्थितीही तपासता येईल. नवीन वीज जोडणीसाठी केलेल्या अर्जाचा मागोवाही ग्राहकांना मोबाईलवरच घेता येणार आहे. ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी २४ तास कार्यरत ‘चॅटबॉट’ची सुविधाही उपलब्ध आहे. या सेवेसाठी महावितरणने ९१६७७७७७९१ हा अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर केला आहे. या क्रमांकावर ‘हाय’ असा संदेश पाठवून ग्राहकांना मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत सेवा घेता येईल.

अधिकारी काय म्हणतात?

वीजबिल मिळाले नाही, अशा तक्रारी वारंवार येत होत्या. आता सर्व माहिती थेट व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणार असल्याने पारदर्शकता वाढेल. ग्राहकांनी या सुविधेचा वापर केल्यास पेपरलेस व्यवहाराला चालना मिळेल. या सेवेचे उद्घाटन लवकरच मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्याची आशा आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.

महावितरणच्या ऑनलाईन सेवा कोणत्या ?

महावितरण कंपनीच्या ऑनलाईन सेवांमध्ये वीज बिल पाहणे व भरणा, नवीन जोडणी अर्ज, तक्रार नोंदणी, मीटर रीडिंग सादर करणे, बिल इतिहास पाहणे, लोड बदल अर्ज, नाव बदल, वीज खंडित माहिती, तसेच मोबाइल अ‍ॅप व वेबसाईटद्वारे विविध सेवा उपलब्ध आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.