– १७०० हून अधिक पदांसाठी हालचाली सुरू
नागपूर :- राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. शासनाचे प्रशासन अनेक संवर्गांमध्ये विभागलेले आहे. यात ३३ विभागांमध्ये, सुमारे ११० आस्थापनांमध्ये ३ हजार ६०० हून अधिक संवर्ग आहेत. या संरचनेत सरळसेवा भरतीसंदर्भात १ हजार ४०० हून अधिक सेवाप्रवेश नियम आहेत.
यातून विविध विभागांमधून स्वतंत्रपणे तितक्याच परीक्षा घेण्यात येत होत्या. या परीक्षा खासगी कंपन्यांकडून घेतल्या जात असल्याने परीक्षेदरम्यान गैरप्रकार होत असल्याची टीका होत होती. त्यामुळे सरळसेवा भरती एमपीएससीकडे देण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. यासाठी शासनाने समिती तयार करून दोन वर्षांपूर्वी सरळसेवा भरतीही एमपीएससीकडे देण्याचा निर्णय घेतला. ‘एमपीएससी’कडे सरळसेवा भरती गेल्यामुळे आता परीक्षांची संख्या कमी होऊन उमेदवारांसाठी भरतीच्या पदांची संख्या वाढणार आहे. यामुळे आता तलाठी भरती प्रक्रिया एमपीएससीच्या माध्यमातून केली जाणार आहे. तब्बल १७०० तलाठी पदांची भरती एमपीएससीकडून होणार असून यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून मागणी पत्र मागवण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला वेग येणार आहे. महसूल विभागाने राज्यात १७०० पेक्षा जास्त तलाठी पदे लवकरच भरून काढण्याचा निर्णय घेतला असून, या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याचे शासनाच्या निर्णयानुसार, जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे. आणि त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्य सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. त्याचाच भाग म्हणून ही भरती राहणार असल्याची माहिती आहे. कुठल्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकणार आहे. मात्र ही भरती एमपीएससी कडून होणार आहे. यापूर्वी २०२३ मध्ये तलाठी भरती घेण्यात आली होती. या तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते.
तलाठी भरतीचा शासन निर्णय काय ?
शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.०२.०४.२०२६ अन्वये महसूल विभागाचा सुधारीत आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. सदर सुधारीत आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावयाची आहेत. आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता बिंदू नामावली मागास वर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे त्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्राचे स्वतंत्र मागणीपत्र व उर्वरित जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरीता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास दि.०८.०५.२०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करावे, ही विनंती केली आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे.